शेवटचं षटक राज बावालाच का?, सूर्यकुमार यादवने पराभवानंतरही मानली नाही चूक, कोणावर फोडले खापर?
सूर्यकुमार यादव RCB विरुद्ध MI IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या थरारक सामन्यात आरसीबीने अखेरच्या चेंडूवर विजय खेचून आणला. रायपूरच्या कठीण खेळपट्टीवर सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचल्याने स्टेडियममध्ये जबरदस्त सस्पेन्स निर्माण झाला होता. 19व्या षटकात जसप्रीत बुमराहने फक्त 3 धावा देत सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला होता. त्यामुळे शेवटचं षटक कोण टाकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
सूर्यकुमार यादवकडे अल्लाह गजनफर आणि विल जॅक्ससारखे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने युवा राज अंगद बावा याच्यावर विश्वास दाखवत त्याच्याकडे अखेरचं षटक सोपवलं. मात्र हा डाव मुंबईला महागात पडला. अनुभवी भुवनेश्वर कुमारने अप्रतिम फलंदाजी करत मुंबईच्या हातातून विजय हिसकावून घेत आरसीबीला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
कृणाल पंड्या आणि भुवीची कमाल
167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. मात्र कृणाल पंड्या याने 73 धावांची दमदार खेळी करत एक बाजू लावून धरली आणि संघाला सामन्यात टिकवून ठेवले. क्रुणाल बाद झाल्यानंतर सामना आरसीबीच्या हातातून निसटतोय असं वाटत होतं. पण शेवटी भुवनेश्वर कुमारने अनपेक्षित फटकेबाजी करत अखेरच्या षटकात 15 धावा वसूल केल्या आणि आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
राज अंगद बावा यालाच शेवटचं षटक का?
सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला राज अंगद बावाकडे शेवटचं षटक देण्याच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सूर्या आपल्या खेळाडूच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. तो म्हणाला, “राज डेथ ओव्हर्सची चांगली तयारी करत होता. या हंगामात तो एक वेगळ्या प्रकारचा ऑलराउंडर म्हणून समोर आला आहे. त्याने जवळपास सामना जिंकूनच दिला होता.” सूर्याने पराभवासाठी फलंदाजीलाही जबाबदार धरलं. “आम्ही किमान 10-15 धावा कमी केल्या,” असंही त्याने स्पष्ट सांगितलं.
आरसीबी अव्वल, मुंबईचा ‘द एंड’
या विजयामुळे पॉइंट्स टेबलचं संपूर्ण गणित बदललं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आता 11 सामन्यांत 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यांचा नेट रनरेट (+1.103) लीगमधील सर्वोत्तम ठरला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. 11 सामन्यांत फक्त 6 गुण मिळाल्याने मुंबईचा प्लेऑफचा प्रवास संपुष्टात आला आहे. मुंबईसोबतच लखनऊ सुपर जायंट्स संघही आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.