सगळा फोकस ठाकरे बंधूंवर ठेवण्यासाठी शरद पवारांनी विजयी मेळाव्याला येणं टाळलं?

मुंबईत राज ठाकरे आणि उदव ठाकरे रॅली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा शनिवारी मुंबईतील वरळी येथे होणार आहे. महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण (Tri language formula) आणि पर्यायाने हिंदी (Hindi) सक्तीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाल्याने राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाबाबतचे दोन जीआर रद्द केले होते. हेच जीआर रद्द करण्यासाठी ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, जीआर रद्द झाल्याने या मोर्चाचे प्रयोजन संपले होते. तरीही एकत्र येण्याची ओढ लागलेल्या ठाकरे बंधूंनी मोर्चा नाही तर मग विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. या विजयी मेळाव्याला महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित राहणार आहेत. परंतु, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता मविआतील पक्षांकडूनही या विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी राज आणि उद्धव हे ठाकरे बंधूच राहतील, असे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

सुरुवातीला या विजयी मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहतील, असे सांगितले जात होते. शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही मनसे- ठाकरे गटाने संपर्क साधल्याचे सांगितले जात होते. मात्र, शुक्रवारी दिवसभरात एक-एक करुन यापैकी कोणीही ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती समोर येत गेली. त्यामुळे सुरुवातीला ठाकरे बंधूंच्या नियोजनावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज असल्याचीही चर्चा रंगली. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विजयी मेळाव्याच्या केंद्रस्थानी ठाकरे बंधूच राहावेत, यासाठी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक मेळाव्याला येणे टाळले असावे.

शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिले आहेत. शरद पवार यांच्या राजकी यश-अपयशाचा मुद्दा असला तरी त्यांना मानणारा आणि ऐकणारा मोठा वर्ग आहे. राजकीय वर्तुळात आजही शरद पवार काय म्हणतात, हे अनेकजण गांभीर्याने ऐकतात. मग असे असतानाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत असताना अशा ऐतिहासिक क्षणी शरद पवार का उपस्थित राहणार नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शरद पवार यांनी ऐनवेळी  काही नियोजित कार्यक्रमांचे कारण पुढे केले होते. परंतु, शरद पवार यांनी ठरवले असते तर ते ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला उपस्थित राहू शकले असते. मात्र, राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार, शरद पवार यांनी जाणीवपूर्वक विजयी मेळाव्याला येणे टाळले असावे. जेणेकरुन या सोहळ्याचा संपूर्ण फोकस आणि लाईमलाईट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राहील, असा विचार असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Sharad Pawar: शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला येणं का टाळलं?

राज ठाकरे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात प्रचंड कटुता निर्माण झाली होती. मात्र, या सगळ्या काळातही ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात होती. अखेर 20 वर्षांनी हे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. तसेच अनेक मराठी मतदारांच्या मनातही अशाप्रकारची सुप्त इच्छा होती. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा जो ऐतिहासिक क्षण आहे, त्यावेळी संपूर्ण लक्ष त्यांच्यावरच असावे किंवा केंद्रस्थानी हे दोघेच असतील, या शक्यता विचारात घेऊन शरद पवार यांनी या मेळाव्याला येणे टाळले असावे, अशी चर्चा आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास मविआचं काय होणार, हा प्रश्न असला तरी त्यामुळे विरोधकांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनीही या विजयी मेळाव्याला उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु, शेवटच्या काही तासांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विजयी मेळाव्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सबकुछ ठाकरे असे स्वरुप असल्यामुळे किंवा या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणीही आकर्षणाचा केंद्रबिंदू असू नये, यासाठी मविआच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक या मेळाव्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

https://www.youtube.com/watch?v=M4vfws7i8uu

आणखी वाचा

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: अवघे काही तास उरले, ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा; सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे बोलणार, राज ठाकरेंची तोफ कधी धडाडणार?, A टू Z माहिती

LIVE Updates: 18 वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र; विजयी मेळाव्याची उत्सुकता शिगेला

आणखी वाचा

Comments are closed.