वनडे वर्ल्ड कप 2027 साठी निवृत्ती मागे घेणार हेनरिक क्लासेन? इंग्लंडच्या माजी खेळाडूचा दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाला सल्ला
आयपीएल २०२६ च्या हंगामात हेनरिक क्लासेन ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे ते पाहून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला मौल्यवान सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी हा सल्ला मानला तर त्यांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामात क्लासेन सनरायझर्स हैद्राबादकडून खेळत आहे.
क्लासेनची आयपीएलमधील फलंदाजी पाहता त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या चर्चा सुरू झाल्या. त्याने मागील वर्षी जूनमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती, मात्र आयपीएलच्या सुरू असलेल्या हंगामात तो ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहून क्रिकेट विश्वातील अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यामधील एकाने तर दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाला क्लासेनच्या निवृत्तीचा पुनर्विचार करण्याचाही सल्लाही दिला आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक २०२७ स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली जाणार आहे. यामुळे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डला क्लासेनच्या निवृत्तीमागे घेण्याची चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
पीटरसनने त्याच्या एक्सच्या अकाउंटवर लिहिले की, “दक्षिण आफ्रिकेने आजवर एकदाही क्रिकेट विश्वचषक जिंकलेला नाही! आज सकाळीच, दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाकडून हेनरिक क्लासेनला एक फोन जायला हवा; ज्यामध्ये त्याला विचारले जाईल की, तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येऊ शकतो का आणि पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेतच होणारा, त्यांचा पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेत तो एक मध्यवर्ती भूमिका बजावू शकतो का?”
क्लासेनने आयपीएल २०२६ मध्ये ९ डावांमध्ये खेळताना ५९.१४ च्या सरासरीने आणि १५७.४१ च्या स्ट्राईक रेटने ४१४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने चार वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
पीटरसनबरोबर क्लासेनचा संघ सहकारी एबी डिविलियर्सनेही त्याचे कौतुक केले आहे. त्याने एक्सवर म्हटले, “आयपीएल २०२६ मध्ये, धावांची संख्या आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीत क्लासेनची तुलना सलामीच्या फलंदाजांशी करणे – विशेषतः सामन्याची परिस्थिती (दबाव आणि मधल्या षटकांमध्ये भागीदारी उभारण्याची गरज) आणि त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या क्षेत्ररक्षणावरील निर्बंधांचा अभाव (सुरुवातीपासून शेवटपर्यंत ५ क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर असणे) लक्षात घेता, हे खरोखरच अविश्वसनीय आहे! थोडक्यात सांगायचे तर, हा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्मात आहे, असे म्हणणे अगदी योग्य ठरेल.”
आयसीसी २०२७ च्या वनडे विश्वचषकाचे यजमानपद नामिबिया आणि झिम्बाब्वेलाही मिळाले आहे.
Comments are closed.