IPL 2026 – हा खेळाडू आहे की AI? वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फटकेबाजीवर जोस बटलरचे गमतीशीर विधान
IPL 2026 मध्ये आपल्या बॅटने गोलंदाजांची दाणादाण उडवणारा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा खेळाडूच्या कामगिरीने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना बटलरने मिश्किलपणे सांगितले की, त्याने जोफ्रा आर्चरला मेसेज करून विचारले होते की, “हा मुलगा खरा आहे की AI? इलॉन मस्कने असा एखादा खेळाडू तर तयार केला नाही ना?” बटलरच्या या विधानावरून सूर्यवंशीने मैदानावर निर्माण केलेल्या दहशतीची कल्पना येते.
वैभवच्या कामगिरीबद्दलची ही चर्चा केवळ गंमतीपुरती मर्यादित नसून आकडेवारीही त्याला पुष्टी देते. या हंगामात त्याने जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांसारख्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांनी टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करताना बटलर म्हणाला की, जिथे प्रशिक्षक 15 वर्षांच्या मुलाला चेंडू नीट बघून खेळायला सांगतात, तिथे वैभवने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत सर्वांना अवाक केले आहे.
IPL 2026 – मुंबईकडून पुनरागमन होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत…, रविचंद्रन अश्विन स्पष्टचं बोलला
मैदानाबाहेरही वैभवने आपल्या हजरजबाबीपणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या बॅटमध्ये ‘AI चिप’ असल्याच्या अफवांना उत्तर देताना तो म्हणाला, “हे सर्व देवाचे देणे आहे. देवानेच मला सांगितले होते की तुझ्या बॅटमध्ये मी काहीतरी विशेष लावून देत आहे आणि मी फक्त त्याचाच वापर करत आहे.” या हंगामात वैभवने केवळ 167 चेंडूंमध्ये 400 धावा पूर्ण करून आंद्रे रसेलचा (188 चेंडू) विक्रम मोडीत काढला आहे.
Comments are closed.