जसप्रीत बुमराहच्या फॉर्मबाबत मुंबई इंडियन्सचे मोठे विधान; प्रशिक्षकांनी केली 'ही' विनंती
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात (IPL 2026), या टी-२० लीगची ट्रॉफी जिंकणाऱ्या दोन मोठ्या संघांसाठी आतापर्यंत सर्व काही ठीक राहिलेले नाही. यात एक नाव मुंबई इंडियन्सचे आहे, ज्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत पण त्यापैकी केवळ दोनच सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. सध्या गुणतालिकेत ते ९ व्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत, प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखणे त्यांच्यासाठी उर्वरित सामन्यांमध्ये अजिबात सोपे असणार नाही. मुंबई इंडियन्सच्या या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या स्टार खेळाडूंचे अपयश. यामध्ये जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे, ज्याला ८ सामन्यांत केवळ २ विकेट्स घेता आल्या आहेत. त्याच्या या खराब फॉर्मबाबत आता मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांचे मोठे विधान समोर आले आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २४३ धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र या लक्ष्याचा बचाव करण्यात त्यांना अपयश आले. या सामन्यानंतर कायरन पोलार्ड जसप्रीत बुमराहच्या फॉर्मबद्दल म्हणाला की, “आम्ही दुर्दैवी आहोत, कारण आम्ही नेहमीच लोकांच्या नजरेत असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमची कामगिरी खराब होते, तेव्हा सर्वांचे लक्ष आमच्याकडे जाते. सामान्य लोक जेव्हा नोकरी करतात आणि त्यांच्याकडून चुकून चुकीचा ईमेल पाठवला जातो, तेव्हा त्यांना तो सुधारण्याची संधी असते; पण आमच्याकडे अशी संधी नसते. जसप्रीत बुमराहला ओळखत असल्याने मला खात्री आहे की, तो अधिक जोमाने पुनरागमन करेल आणि विकेट्स घेईल. तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल आणि जुन्या लयीत दिसेल अशी आम्हा सर्वांना आशा आहे, पण सध्या आपण त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.”
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने ८ सामने खेळल्यानंतर सहा पराभव पत्करले आहेत, ज्यामुळे त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. यावर पोलार्ड म्हणाला की, “आम्ही अजून या स्पर्धेतून बाहेर पडलेलो नाही आणि आम्ही हार मानलेली नाही. आम्ही पुन्हा एकदा उणीवा शोधू आणि या हंगामात किती पुढे जाऊ शकतो हे पाहू.” मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना आता २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.
Comments are closed.