धाराशिवमध्ये महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न, महिला गंभीर जखमी
महाराष्ट्र दिनानिमित्त धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी अत्यंत धक्कादायक घटना घडली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक हे शहरात उपस्थित असतानाच बीबी किशनराव पाटील या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या घटनेत बीबी किशनराव पाटील या सुमारे 50 टक्के भाजल्या असून, त्यांच्यावर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
बीबी पाटील या भूविकास बँकेत नोकरीला होत्या. मात्र बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर त्यांच्या सेवेला मोठा फटका बसला. प्रलंबित वेतन, सेवा लाभ तसेच बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करून घेण्याची मागणी त्या सातत्याने प्रशासनाकडे करत होत्या. संपूर्ण पगार मिळावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, यासाठी त्यांनी अनेकदा निवेदने दिली होती. विशेष म्हणजे, त्यांनी 20 तारखेलाच आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन प्रशासनाला दिले होते. मात्र पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या प्रमुख कार्यक्रमादरम्यान संतप्त अवस्थेत त्यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी त्या गंभीररीत्या भाजल्या आहेत. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा व्यवस्था, निवेदनांवरील कार्यवाही आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Comments are closed.