लिंबू-टिंबू नाही म्हणायचं…
>> मंगेश वरवडेकर
कुरासाव, कोंगो, काबो व्हर्डे, बोस्निया-हर्झेगोव्हिना, जॉर्डन… वर्ल्ड कपच्या ड्रॉवेळी ही नावं पाहिली आणि अनेक फुटबॉल पंडितांनी नाक मुरडलं. काहींची प्रतिक्रिया तर अशी होती, जणू पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ताटात भेंडीची भाजी आली आहे. 32 वरून 48 संघ झाल्यावर फुटबॉलच्या तथाकथित जाणकारांनी भविष्यवाणी केली होती. आता विश्वचषकाची वाट लागणार. सामने एकतर्फी होणार. गोलांचा धबधबा वाहणार. मोठे संघ लहान संघांना धुऊन काढणार.
थोडक्यात काय, तर या छोटय़ा संघांना विश्वचषकात प्रवेश देणे म्हणजे वाघांच्या जंगलात बकऱया सोडण्यासारखे आहे, अशी त्यांची समजूत होती. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. बकऱयांनीच वाघांच्या शिंगांना धरून हलवायला सुरुवात केली आहे.
एकेकाळी वर्ल्ड कप म्हणजे मोठय़ा दादांचा गणेशोत्सव असायचा. ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड ही मंडळी पहिल्या रांगेतल्या सोफ्यावर बसायची. बाकीचे संघ म्हणजे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत मागे चालणारे कार्यकर्ते. त्यांचं काम एकच. यायचं, हरायचं, फोटो काढायचे आणि विमान पकडून घरी जायचं. पण यंदा या ‘कार्यकर्त्यांनी’ थेट अध्यक्षपदावर दावा ठोकलाय!
काल कोंगोचा खेळ पाहताना मला क्षणभर वाटलं, हा संघ पोर्तुगालविरुद्ध खेळतोय की पोर्तुगालची चौकशी करतोय? रोनाल्डोला त्यांनी असा घेरला होता, जसा मुंबईत ट्रफिक पोलिसांनी चुकीच्या पार्किंगवाल्याला घेरावं!
काबो व्हर्डेने स्पेनला इतकं झुलवलं की स्पॅनिश चाहत्यांना दुसऱया महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतिहासाची भीती वाटली असेल आणि काबो व्हर्डे? अरे, त्या देशाची लोकसंख्या मुंबईच्या एका उपनगराइतकीही नाही. पण स्पेनसमोर ते ज्या ऐटीत उभे राहिले, ते पाहून वाटलं की हा सामना स्पेन विरुद्ध काबो व्हर्डे नसून स्पेन विरुद्ध स्वतःचा अहंकार आहे.
पूर्वी मोठय़ा संघांचे खेळाडू छोटय़ा संघांकडे पाहायचे, जसा एखादा उद्योगपती आपल्या ऑफिसबॉयकडे पाहतो. आज परिस्थिती अशी आहे की ऑफिसबॉयने स्वतःची कंपनी काढलीय आणि उद्योगपतीची ऑर्डर हिसकावून नेलीय.
एकेकाळी या छोटय़ा संघांचा उपयोग गोलफरक वाढवण्यासाठी व्हायचा. ब्राझीलला आत्मविश्वास हवा? चला, एखादा छोटा संघ समोर आणा.
स्पेनचा फॉर्म बिघडलाय? काही हरकत नाही. छोटय़ा संघाविरुद्ध चार गोल मारा आणि फॉर्म परत मिळवा. आज मात्र या ‘औषधाने’च दुष्परिणाम सुरू केले आहेत. मोठय़ा संघांचा फॉर्म सुधारण्याऐवजी
रक्तदाब वाढायला लागलाय!
फुटबॉलमध्ये जागतिकीकरणाने अशी क्रांती केली आहे की आता आफ्रिकन, कॅरेबियन किंवा आशियाई खेळाडू युरोपियन क्लबमध्ये रोज दिग्गजांशी दोन हात करतात. त्यामुळे त्यांना ब्राझील, स्पेन किंवा फ्रान्सची जर्सी पाहून ताप भरत नाही. पूर्वी जर्सी पाहून गुडघे थरथरायचे.
आता जर्सी पाहून ते विचारतात… ‘ही बदलून मिळेल का?’
मला तर वाटतं, पुढच्या विश्वचषकापूर्वी ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, जर्मनी यांनी मिळून एक नवीन संघटना स्थापन करावी. ‘मोठय़ा संघांचे संरक्षण मंच!’ त्यांच्या मागण्या अगदी रास्त असतील.
काबो व्हर्डेविरुद्ध सामना नको. कोंगोविरुद्ध खेळताना अतिरिक्त खेळाडू द्या. कुरासावविरुद्ध सामना दिवसाऐवजी रात्री घ्या. जॉर्डनसमोर खेळताना मानसिक आधारासाठी मानसोपचारतज्ञ द्या. कारण आता फुटबॉलमध्ये गरीब-श्रीमंत, मोठे-लहान, जुने-नवे हे भेद राहिलेले नाहीत. क्रिकेटमध्ये अजूनही एखादा लहान संघ मोठय़ाला हरवतो तेव्हा त्याला आपण धक्का म्हणतो. फुटबॉलमध्ये तो धक्का राहिलेला नाही. त्याला ‘नॉर्मल’ म्हणतात आणि हीच या विश्वचषकाची सर्वात मोठी गोष्ट आहे.
कारण इथे फक्त गोल होत नाहीत. इथे सिंहासनं हादरत आहेत. इथे इतिहासाला घाम फुटतोय.
इथे नावापेक्षा खेळ मोठा ठरतोय आणि इथे काबो व्हर्डे, कोंगो, कुरासाव, जॉर्डनसारखे देश जगाला एकच गोष्ट सांगतायत, ‘आम्हाला लिंबू-टिंबू समजण्याची चूक करू नका…कारण त्यांनी जगाला दाखवून दिलंय की, नकाशावर देशाचा आकार लहान असला, तरी छातीचा घेर मोठा असू शकतो!
Comments are closed.