दीड वर्षानंतर आरसीबीच्या स्टार खेळाडूचे पुनरागमन, रणजी ट्रॉफीसाठी यूपीच्या कॅम्पमध्ये एन्ट्री

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार खेळाडू यश दयाल आयपीएल 2025 पासून क्रिकेटपासून दूर होता. काही गंभीर आरोपांमुळे त्याने या खेळापासून काही काळ माघार घेतली होती. मात्र, आता त्याला क्रिकेटमध्ये परतण्याची परवानगी मिळाली असून, आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी तो उत्तर प्रदेशच्या संघात सामील होऊ शकतो. त्याने आधीच तयारी सुरू केली आहे . रणजी ट्रॉफी 2026-27 च्या संघात त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे. दयालने शेवटचा सामना आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत खेळला होता.
यश दयालवर गाझियाबादमध्ये लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. दयालने हे सर्व आरोप फेटाळून लावत ते खोटे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. याव्यतिरिक्त, जयपूरमधील एका अल्पवयीन मुलीनेही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आरसीबीने यश दयालला संघात कायम (रिटेन) ठेवले असले तरी, तो आयपीएल 2026 मध्ये खेळू शकला नाही किंवा उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेटही खेळू शकला नाही.
मीडियाशी बोलताना उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (UPCA) सीईओ अंकित चॅटर्जी यांनी दुजोरा दिला की, यश दयाल निवडीसाठी उपलब्ध आहे. त्यांनी सांगितले की, दयाल यावर्षी उपलब्ध आहे, त्याने चाचणी सत्रांमध्ये भाग घेतला आहे आणि सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता तो रणजी ट्रॉफीच्या शिबिरात सामील होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या रणजी ट्रॉफी संघाचे शिबिर लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केले जाईल. या शिबिरादरम्यान मुख्य संघात स्थान मिळवण्याचे यश दयालचे ध्येय असेल.
गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्यामुळे, यश दयालने पुढील हंगामात छत्तीसगडसाठी खेळण्यासाठी यूपीसीएकडे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले होते. मात्र, यूपीसीएने त्याला पुन्हा उत्तर प्रदेशसाठी खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता तो यूपीच्या शिबिरात सामील झाल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.
एका वादामुळे यश दयाल आयपीएल 2026 मध्ये खेळू शकला नाही. यश दयालला संधी का मिळाली नाही, याबद्दल विचारले असता आरसीबीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट मो. बोबट यांनी सांगितले की, यश दयाल आणि आरसीबी यांच्याशी संबंधित परिस्थितीचा विचार करता, त्याला न खेळवणे हाच योग्य निर्णय होता.
Comments are closed.