Yavatmal News – आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात अभिजित दिपकेंसमोर धोत्रेकरांनी मांडला समस्यांचा पाढा!
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विधानसभा मतदारसंघातील धोत्रा गावात नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखविला. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आयोजित केलेल्या जनतेच्या चावडीत शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी विविध प्रश्न मांडत प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. शेतीच्या समस्या, पीकविमा, नुकसानभरपाई, बेरोजगारी, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न यावेळी ऐरणीवर आले. विशेष म्हणजे, शिक्षणासंदर्भातील तक्रारींची दखल घेत दिपके यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यामुळे या चावडीची गावात विशेष चर्चा रंगली.
मंत्र्यांच्या मतदारसंघात प्रश्नांचा डोंगर!
कळंब तालुक्यातील धोत्रा हे गाव आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विधानसभा क्षेत्रात येते. मात्र, गावातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची कैफियत ग्रामस्थांनी चावडीत मांडली. शेतीचे नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी, पीकविम्याची अडचण, शेतकऱ्यांच्या विविध समस्या याकडे लक्ष वेधण्यात आले. दुसरीकडे, शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने युवकांनीही आपली व्यथा मांडली.
शिक्षणाधिकाऱ्यांना थेट फोन; तक्रारींची दखल
चावडीत शिक्षणविषयक तक्रारी समोर आल्यानंतर अभिजित दिपके यांनी वेळ न दवडता थेट शिक्षणाधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला. गावातील शिक्षणविषयक प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देत त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न ठेवता ते थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला.
प्रश्न मांडले; आता उत्तरांची प्रतीक्षा!
शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जनतेच्या चावडीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील गावकऱ्यांनाही आपल्या समस्या मांडण्यासाठी अशा व्यासपीठांचा आधार घ्यावा लागत असल्याचे या निमित्ताने समोर आले. चावडीत मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, संबंधित समस्यांचे निराकरण कधी होते, याकडे आता धोत्रेकरांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.