योगी आदित्यनाथ असतील चेहरा : नितीन नवीन
लखनौ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असली तरीही राजकारण आतापासून तापू लागले आहे. समाजवादी पक्षाने दादरी येथून मिशन-2027 चा शुभारंभ केला, तर भाजपनेही आता स्वत:च्या रणनीतिला उघड केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढविली जाणार असल्याची घोषणा भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वात सरकार चालविले जात आहे. अशास्थितीत निश्चितपणे तेच आमचे चेहरे असतील असे म्हणत नितिन नवीन यांनी योगींच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच उत्तरप्रदेशात सत्तेची हॅटट्रिक करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशला आता उत्तम प्रदेश करण्याची प्रक्रिया जोरदारपणे सुरू आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशला गुन्ह्यांसाठी ओळखले जात होते, वसुलीसाठी ओळखले जायचे, जातीच्या आधारावर लोकांना भ्रमित केले जात होते, परंतु आता हाच उत्तरप्रदेश विकासासाठी ओळखला जातोय, द्रूतगती मार्ग, कायदा-सुव्यवस्थेसाठी ओळखला जातोय. सुशासन, विकास, पायाभूत सुविधांप्रकरणी उत्तरप्रदेश अग्रगण्य राज्यांसारखेच काम करत असल्याचे भाजप अध्यक्ष म्हणाले.
Comments are closed.