वैभव सूर्यवंशीच्या पहिल्या शतकात अडथळा ठरलेल्या खेळाडूचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, “झिम्बाब्वेविरुद्ध नको…”
भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी आपल्या सहाव्याच सामन्यात टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिले शतक झळकावण्याच्या उंबरठ्यावर होता, मात्र अवघ्या 19 धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने रविवारी (26 जुलै) खेळल्या गेलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 49 चेंडूंत 81 धावा केल्या. त्याला हे शतक करण्यापासून ज्याने रोखले त्याने त्याची योजना सांगितली आहे.
हरारेमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वैभवने 8 चौकार आणि 4 षटकारांसह आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचे शॉट्स सिलेक्शन पाहता तो शतक करणार असे वाटत असताना, झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू ब्रॅड इव्हान्सने त्याला रोखले. इव्हान्सने वेल्सी माधेवेरेच्या गोलंदाजीवर वैभवचा लॉंग-ऑफला उत्तम झेल घेतला.
डावाच्या ब्रेकमध्ये इव्हान्सने माध्यमांना सांगितले की, त्याला वैभवचे शतक पूर्ण होऊ द्यायचे नव्हते आणि म्हणूनच त्याने विशेष प्रयत्न करत तो झेल घेतला.
वैभवने 15 व्या षटकातील शेवटचा चेंडू लाँग-ऑफच्या दिशेने मारला. तिथे इव्हान्स धावत पुढे आला आणि झेप घेऊन दोन्ही हातांनी एक उत्कृष्ट झेल घेतला. याचबरोबर वैभवचे शतकाचे स्वप्न भंगले.
इव्हान्स म्हणाला, “अर्थातच वैभव एक मोठा खेळाडू असून तो भविष्यात मोठी कामगिरी करेल, मात्र त्याने झिम्बाब्वेविरुद्ध पहिले शतक करावे असे मला वाटत नव्हते आणि म्हणूनच मी तो झेल घ्यायला अधिक प्रयत्न केले.”
भारताने या दौऱ्यात तिन्ही सामने जिंकत मालिकेत 3-0 असा मोठा विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच टी20 मालिका विजय ठरला. यामध्ये वैभवची कामगिरी प्रभावी ठरली. त्याने दोन अर्धशतकांसह सर्वाधिक 151 धावा केल्या. यामुळे तो शेवटच्या सामन्यातील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ सह मालिकावीरही ठरला.
वैभव सर्वात कमी वयात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ जिंकणारा क्रिकेटपटू ठरला आहे. (ZIM vs IND 3rd T20 Shocking revelation by Brad Evans to stop Vaibhav Sooryavanshi maiden century! He said, “Not against Zimbabwe…”)
Comments are closed.