अंबादास दानवेंसह दहा जण विधान परिषदेवर बिनविरोध; शिवसेना 1, भाजप 6, शिंदे गट 2 तर अजित पवार गटाला 1 जागा
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांनी तर शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू आणि अजित पवार गटाकडून झिशान सिद्दिकी यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दहा जागांसाठी दहा उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधान परिषदेच्या नियमित नऊ आणि पोटनिवडणुकीच्या एका जागेजासाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, असा सर्वांचा आग्रह होता. मात्र शिवसेनेकडून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून अंबादास दानवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
झिशान सिद्दीकी यांना लॉटरी
महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटय़ाला आलेल्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. जवळपास 75 जण इच्छुक असताना काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आलेल्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे.
तीन अपक्षांचे अर्ज बाद
शिवसेनेने 1, भाजप 6, शिंदे गट 2 आणि अजित पवार गटाकडून 1 असे एकूण दहा अर्ज तर तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र या अर्जांवर सूचक म्हणून आवश्यक असलेल्या दहा आमदारांच्या सह्या नाहीत. यामुळे ते अर्ज आपसूकच बाद ठरले आहेत.
आमदारकीसाठी बच्चू कडू विलीन
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू आज आमदारकीसाठी शिंदे गटात विलीन झाले. शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी शिंदे यांनी जाहीर केली. आमदारकीसाठी पक्ष विलीन करायला मी मूर्ख नाही असे बच्चू कडू यांनी बुधवारी छातीठोकपणे सांगितले होते. मात्र आज ते शिंदे गटात डेरेदाखल झाले.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, सतेज पाटील उपस्थित होते.
Comments are closed.