हिशेब चुकता! बीपीसीएलला नमवत आयएसपीएल अजिंक्य, पाच-पाच चढायांच्या थरारात आयएसपीएलची सरशी

चार दिवसांपूर्वीच्या पराभवाची जखम ताजी असतानाच आयएसपीएलने मैदानात उतरून अक्षरशः सुडाची ज्वाला पेटवली आणि बीपीसीएलचा हिशेब चुकता करत आमदार चषकावर आपले नाव कोरले. क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने आयोजित व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांनी बीपीसीएलला थरारक पाच-पाच चढायांच्या संघर्षात 9-4 (46-41) असे नमवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कबड्डीच्या महासंग्रामाचा शेवट अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. हा सामना म्हणजे जणू एखाद्या अॅक्शनपटाचा क्लायमॅक्ससारखा रंगला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित आणि रोमांचक!

बीपीसीएलचे कमबॅक, पण आयएसपीएलच भारी

सामन्याच्या सुरुवातीलाच नीरज मिसाळ आणि राकेश खटकर यांनी सुसाट खेळ करत आयएसपीएलला 10-3 अशी झंझावाती आघाडी मिळवून दिली. किशोर जाट आणि वैभव रबाडे यांच्या अचूक पकडींनी बीपीसीएलला अक्षरशः जखडून टाकले आणि आयएसपीएलने मध्यंतराला 21-13 अशी पकड मजबूत केली.

उत्तरार्धात मात्र मिलन दहियाने एकहाती झुंज देत बीपीसीएलला परत सामन्यात आणले. त्याच्या वेगवान आणि धडाकेबाज चढायांनी सामना रंगत गेला. 19-33 अशा पिछाडीवरून बीपीसीएलने शेवटच्या क्षणी जबरदस्त कमबॅक करत 37-37 अशी बरोबरी साधली आणि इथेच सामन्याने खऱया अर्थाने नाटय़मय वळण घेतले.

नीरज मिसाळ बाईकवर स्वार

या थरारक लढतीत आयएसपीएलचा नीरज मिसाळ चमकला. त्याच्या तुफानी चढायांमुळे आयएसपीएल विजेता ठरलाच, पण त्याने पूर्ण स्पर्धेत आपल्या चढायांचा हल्ला प्रतिस्पर्धी संघावर केला. म्हणून त्याला स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’चा किताब मिळाला आणि आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते त्याला बाईक देऊन गौरविण्यात आले. बीपीसीएलचा मिलन दहिया ‘सर्वोत्तम चढाईवीर’ ठरला, तर सीजीएसटीच्या साईप्रसाद पाटीलने ‘पकडपटू’चा मान पटकावला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे, प्रसिद्ध कबड्डी निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

पाच-पाच चढायांत आयएसपीएल सुस्साट

बरोबरीनंतरचा पाच-पाच चढायांचा डाव म्हणजे थराराचा परमोच्च बिंदू. याच क्षणी आयएसपीएलने आपली खरी ताकद दाखवली. बचावात चपळाई, चढायांत अचूकता आणि दबावाखालीही स्थिर डोपं ठेवत त्यांनी बीपीसीएलला 9-4 असे चितपट केले आणि जेतेपदावर कब्जा केला.

आयएसपीएलचा विजयी धडाका कायम

हे आयएसपीएलचे हंगामातील चौथे जेतेपद ठरले. याआधी त्यांनी अमरावती, वाशीम येथील आमदार चषक आणि मुंबईतील परळ येथे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या स्पर्धेत बाजी मारत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग तीन जेतेपदानंतर आयएसपीएलची घोडदौड बीपीसीएलने मधेच खंडित केली होती, पण या विजयाने आयएसपीएलने पुन्हा आपला दरारा कबड्डी विश्वात दाखवला आहे. सामना बरोबरीत सुटला असला तरी दोन्ही सत्राच्या खेळावर आयएसपीएलच्या खेळाडूंचेच वर्चस्व होते, हे कुणीही नाकारू शकत नाही.

Comments are closed.