पावसाळ्यात हेल्मेटमधून कुबट, घाणेरडा वास येतोय?

दुचाकीस्वारांसाठी पावसाळा ऋतू अनेक अडचणी घेऊन येतो. त्यातलीच एक सर्वात मोठी आणि त्रासदायक समस्या म्हणजे पावसाळ्यात हेल्मेटमधून येणारा कुबट आणि घाणेरडा वास. पावसाचे पाणी, डोक्याला येणारा घाम आणि दमट हवामान यामुळे हेल्मेटच्या आतील बाजूस बॅक्टेरिया आणि फंगस  वाढू लागते. यामुळे केवळ दुर्गंधीच येत नाही, तर कोंडा, केस गळणे आणि त्वचेचे इन्फेक्शन यांसारख्या आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. तुम्हीही अशा विविध समस्येने त्रस्त असाल, तर जाणून घेऊयात काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय. helmet care in monsoon season

वर्तमानपत्र

वर्तमानपत्र ओलावा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. रात्री झोपताना जुन्या वर्तमानपत्राचे काही बोळे करून ते हेल्मेटमध्ये व्यवस्थित दाबून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कागद काढून टाका; यामुळे हेल्मेटमधील दुर्गंधी दोन्ही शोषले जाईल.

पॅडिंगची स्वच्छता

हेल्मेट्सचे आतील पॅडिंगसहज काढता येते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किमान एकदा हे पॅडिंग माईल्ड शॅम्पू किंवा डिटर्जंटने स्वच्छ धुवा आणि फॅनखाली पूर्णपणे वाळल्यानंतरच पुन्हा हेल्मेटमध्ये बसवा.

बेकिंग सोडा

जर हेल्मेटमधून खूपच उग्र वास येत असेल तर त्याच्या आतील बाजूला 2 चमचे बेकिंग सोडा शिंपडा. 2 तासांनंतर एक स्वच्छ आणि कोरडा कपडा घेऊन तो सोडा पुसून काढा. बेकिंग सोडा बॅक्टेरिया आणि दुर्गंधी मुळापासून नष्ट करतो.

सुती स्कार्फ

हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्याला सुती रुमाल बांधा किंवा स्कल कॅप घाला. यामुळे  घाम थेट हेल्मेटच्या कुशनमध्ये जिरणार नाही आणि हेल्मेट जास्त काळ कोरडे राहील.

अँटी-बॅक्टेरियल स्प्रे

हेल्मेटसाठी खास अँटी-बॅक्टेरियल आणि डीओडोरायझर स्प्रे उपलब्ध आहेत. हेल्मेट वापरल्यानंतर हा स्प्रे आत मारल्यास जंतूंचा नाश होतो आणि चांगला सुगंध येतो.

हेही वाचा – मान्सून ट्रेकची तयारी सुरू आहे? अशी करा योग्य ट्रेकिंग शूजची निवड

Comments are closed.