Kitchen Tips: थर्मासमधला चहा किती वेळ चांगला राहतो?




थर्मासमधला चहा किती वेळ चांगला राहतो?


सकाळी एकदाच चहा बनवून तो दिवसभर थर्मासमध्ये ठेवून पिण्याची सवय अनेक घरांत आणि ऑफिसमध्ये दिसते. गरम आहे म्हणजे चांगला आहे असा साधा विचार करून आपण तो चहा पुन्हा पुन्हा पितो. पण खरोखरच थर्मासमधला चहा किती वेळ सुरक्षित असतो? आणि जास्त वेळ ठेवल्यास त्याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं गरजेचं आहे. (how long tea stays safe in thermos)

थर्मासमध्ये चहा ठेवण्याचे फायदे
थर्मासचा वापर हा सोयीसाठी केला जातो. एकदाच चहा बनवून ठेवला, की वारंवार गॅस किंवा वीज वापरण्याची गरज पडत नाही. प्रवासात किंवा ऑफिसमध्येही गरम चहा सहज उपलब्ध होतो. थर्मासमध्ये असलेल्या इन्सुलेशनमुळे चहा अनेक तास गरम राहतो. त्यामुळे तो लगेच थंड होत नाही आणि पिण्यासाठी सोयीचा वाटतो. घरचा चहा असल्यामुळे बाहेरचा चहा पिण्यापेक्षा तो अधिक सुरक्षितही वाटतो.

चहा किती वेळ चांगला राहतो?
तज्ज्ञांच्या मते, ताजा बनवलेला चहा स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या थर्मासमध्ये ठेवला असेल, तर तो साधारण 2 ते 4 तास चांगल्या चवीसह पिण्यास योग्य राहतो. थर्मासमध्ये ठेवलेला चहा 6 तासांपर्यंत सुरक्षित मानला जाऊ शकतो, मात्र त्यानंतर त्याची चव, सुगंध आणि ताजेपणा कमी होऊ लागतो जर चहा 8 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवला असेल, तर तो टाळलेलाच चांगला विशेषतः जर तो दुधाचा चहा असेल तर. दुधाच्या चहाबाबत विशेष काळजी दुधाचा चहा थर्मासमध्ये जास्त वेळ ठेवणं अधिक धोकादायक ठरू शकतं. कारण दुधामध्ये जिवाणू वाढण्याची शक्यता जास्त असते. जर थर्मास नीट स्वच्छ नसेल, तर हे जिवाणू आणखी वेगाने वाढू शकतात. असा चहा प्यायल्यास पोटदुखी, गॅस, आम्लपित्त किंवा अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

जास्त वेळ ठेवलेल्या चहाचे दुष्परिणाम
थर्मासमध्ये खूप वेळ ठेवलेला चहा केवळ चवीतच नाही, तर गुणधर्मांमध्येही बदल घडवतो. चव आणि सुगंध कमी होतो. चहा शिळा वाटू लागतो. अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी होते आणि त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे ताजा चहा आणि साठवून ठेवलेला चहा यामध्ये स्पष्ट फरक जाणवतो.

चहा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
– थर्मासमध्ये चहा ठेवताना काही साध्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर त्याचा धोका कमी करता येतो.
– नेहमी ताजा आणि गरम चहा थर्मासमध्ये टाका.
– थर्मास रोज नीट धुवून कोरडा ठेवणं महत्त्वाचं आहे.
– शक्यतो 4 तासांच्या आत चहा संपवण्याचा प्रयत्न करा.
– जर जास्त वेळ चहा ठेवायचा असेल, तर काळा चहा वेगळा ठेवा आणि दूध वेगळं घालून प्या. यामुळे चहा जास्त वेळ सुरक्षित राहू शकतो.



Comments are closed.