Sugarcane Juice: उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये असते ‘इतके’ चमचे साखर

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसू लागते. थंडगार उसाचा रस प्यायल्यावर शरीराला ताजेपणा मिळतो, थकवा कमी होतो आणि क्षणात एनर्जी आल्यासारखं वाटतं. त्यामुळे अनेक जण हा रस निर्धास्तपणे पितात. मात्र शरीराला गारवा देणाऱ्या या पेयामध्ये साखरेचं प्रमाण किती असतं, हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे नकळत शरीरात मोठ्या प्रमाणात साखर जात असते.

एका ग्लासमध्ये किती साखर असते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, साधारण 200 एमएलच्या एका ग्लास उसाच्या रसामध्ये जवळपास 7 चमचे साखर असू शकते. आपण थेट 7 चमचे साखर खाण्याचा विचार केला, तर ते जवळपास अशक्य वाटेल. पण उसाचा रस द्रवरूपात असल्यामुळे त्यातील साखर सहजपणे शरीरात जाते आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही.

उसाच्या रसामध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतात. त्यामुळे उन्हातून आल्यावर तो प्यायल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. मात्र हीच साखर जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस मर्यादित प्रमाणातच घ्यावा.

जास्त प्रमाणात प्यायल्यास होऊ शकतात हे त्रास:
1) उसाच्या रसात कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण जास्त असल्याने वारंवार सेवन केल्यास लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

2) रस्त्याच्या कडेला उघड्यावर बनवला जाणारा रस स्वच्छ नसेल, तर त्यातून जिवाणू शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे पोटदुखी, जुलाब किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

3) काही लोकांना उसाचा रस प्यायल्यानंतर पोट फुगणे, जडपणा किंवा गॅसचा त्रास जाणवू शकतो.

4) काही वेळा उसाचा रस प्यायल्यावर शरीरावर खाज येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी अॅलर्जीची लक्षणेही दिसू शकतात.

उसाचा रस प्यायचा असल्यास काय काळजी घ्यावी?
– नेहमी स्वच्छ आणि ताजा रसच प्या.
– दिवसातून एक ग्लासपेक्षा जास्त सेवन टाळा.
– मधुमेह किंवा वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
– बर्फ आणि अस्वच्छ पाणी वापरणाऱ्या गाड्यांपासून सावध राहा.

Comments are closed.