बावनकुळेंचे मकाऊतील कॅसिनोचे फोटो बडगुजरांनीच राऊतांना पोहोचवल्याची चर्चा, म्हणूनच पक्षप्रवेशाव
भाजपमधील सुधाकर बॅडगुझर: नाशिकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप (BJP) मुख्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी सुधाकर बडगुजर आज (मंगळवारी) सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असे सांगितले, त्यानंतर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांचा आणि आमदारांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचंही यावेळी बोलून दाखवलं. यादरम्यान सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे यांच्या वादाची चर्चा रंगली आहे.
सुधाकर बडगुजर आणि बावनकुळे वाद नेमका काय?
सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये आज प्रवेश होतं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असे सांगितले. यामुळे बडगुजर यांच्या प्रवेश बाबत बावनकुळे यांची सहमती नाही का असा सवाल उपस्थित होत असून त्यासाठी काही महिने फ्लॅशबॅकमध्ये जावे लागणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माकाऊला कुटूंबासोबत गेले असताना त्याचे मकाऊ मधील कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या होत्या, हे फोटो बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यां पर्यंत पोहचविले असे आरोप केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा विरोध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच बरोबर मुबंई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाच केल्याचा बडगुजर यांचा व्हिडीओ भाजप मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला होता, त्यामुळे बडगुजर यांना थेट देशद्रोही ठरविण्यात आले होते आणि आता त्याच भाजप मध्ये बडगुजर यांचा प्रवेश होत आहे, यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
‘त्या’ फोटोवर बावनकुळे स्पष्टीकरण देताना म्हटलं…
व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं. अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाला इमेज खराब करता येत नाही. मोठा संघर्ष करून आम्ही इथेपर्यंत आलो आहे. यामुळे परिवाराला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. मी महिन्याभरातून एकदाच घरी जातोय. त्यावेळी माझ्या कुटुंबाने तीन दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही हाँगकाँगला गेलो. त्या ठिकाणी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी कसिनो आहेच. त्याला क्रॉस करूनच तुम्हाला तुमच्या रुमपर्यंत किंवा जेवणाच्या ठिकाणापर्यंत जावं लागतं. त्याचवेळी कुणीतरी हा फोटो काढला आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असं स्पष्टीकरण त्यांनी फोटो व्हायरल झाल्यानंतर दिलं होतं.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
https://www.youtube.com/watch?v=rv6whany0ek
आणखी वाचा
Comments are closed.