भयंकर! मुंबईत समलिंगी तरुणाने आपल्या एक्स-बॉयफ्रेण्डला संपवलं; कोल्ड्रिंक पाजलं अन् बेडवरच…
मुंबई गुन्हेगारीच्या बातम्या: मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 19 वर्षीय समलिंगी तरुणाने त्याच्या 16 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डची विष देऊन हत्या केली आहे. तरुणाने दिलेले कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर अल्पवयीन मुलगा बेडवरच बेशुद्ध पडला होता. यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सुरुवातीला मयत आणि आरोपी यांच्यातील नेमक्या नात्याबाबत संभ्रम होता, परंतु अधिक तपासात दोघांमध्ये समलैंगिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा 29 जून रोजी फिरण्यासाठी घरातून बाहेर गेला, मात्र तो परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर त्याच्या एका मित्राकडून समजले की, त्या मुलाला शेवटचे आरोपीच्या घरी पाहिले गेले होते. त्याआधारे कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतला असता, तो मुलगा तेथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोल्ड्रिंकमध्ये कीटकनाशक टाकून संपवलं
आरोपीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते की, दोघांनी आपापल्या इच्छेने कोल्ड्रिंक घेतले होते. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आढळल्यानं पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळल्याची कबुली दिली. त्याने कोल्ड्रिंकमध्ये कीटकनाशक टाकल्याचे उघड झाले. ते प्यायल्यानंतर पीडित मुलाला उलट्या होऊ लागल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीलाही उलट्या होत असल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांनंतर त्याची प्रकृती सुधारल्याची माहिती समोर आहे.
मुलाने आरोपीशी संपर्क टाळायला सुरुवात केली, अन्…
दरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी आरोपी तरुणाने त्या अल्पवयीन मुलाला नागपूरला नेले होते, त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर मुलाने आरोपीशी संपर्क टाळायला सुरुवात केली, ज्यामुळे आरोपी नाराज होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तर मुलाच्या मित्रांनी “आरोपीने जेव्हा संपर्क साधला, तेव्हा मयत मुलगा तणावात दिसत होता,” अशी माहिती देखील पोलिसांना दिली आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सध्या न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भावनिक ताणतणाव आणि संबंधित मुलाने दुरावा निर्माण केल्यामुळे आरोपीने हे टोकाचं पाऊल उचललं, असे पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र, या धक्कादायक घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.