पत्नीवर अंत्यसंस्कार, मात्र रक्षाविसर्जनानंतर संजना परतली, आख्खं गाव चक्रावलं, आश्चर्यकारक घटना

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर गावात एक धक्कादायक, आश्चर्यकारक आणि तितकाच गूढ प्रकार समोर आला आहे. संजना महेश ठाणेकर (वय 37) ही हरवलेली पत्नी मृत समजून तिच्यावर पतीसह कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, रक्षाविसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे, पती महेश यांच्यासह कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आलेली, स्मशानात जाळण्यात आलेली महिला कोण होती? असा प्रश्न आता सर्वांसमोर उपस्थित झाला असून आपण आजच पोलीस (Police) स्टेशनला जाऊन पोलिसांपुढे जबाब देणार असल्याचे महेश ठाणेकर यांनी म्हटले. तसेच, पोलिसांनी माझ्या पत्नीला शोधून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना ह्या 19 जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. परंतु ती माहेरी गेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसांत पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, 29 जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्याने अंगावरील कपडे, तिचे केस, गळ्यातील दागिने व गालावरील तिळाच्या आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचे मानून पतीने मृतदेहाची खात्री पटवली. त्यानंतर, उदगाव येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनही करण्यात आले. मात्र, 30 जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परतल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. याबाबत माहिती मिळताच तिला गुरुवार 31 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी, आपण घरातून निघून गेल्यानंतर तासगाव आणि बारामती येथे गेलो होतो, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ती कोठे निघून गेली माहिती नाही.

पोलिसांनी पत्नीला बोलावून घेण्याची मागणी

दरम्यान, आमचा घटस्फोट किंवा कोणताही वाद नसताना पोलिसांनी मला संजनाची भेट घालून दिली गेली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की, ज्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे हे मिरज व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! बलात्कारी प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप, विशेष कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; माजी पंतप्रधानांचा नातू अडकला

आणखी वाचा

Comments are closed.