आमची 51 टक्के मतांची तयारी झालीय, ठाकरेंच्या युतीवर प्रत्त्युत्तर; बावनकुळेंनी सांगितलं गणित

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून रणनीती आखण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका (बीएमसी) काहीही करुन आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असली तर, ठाकरेंच्या ताब्यातून बीएमसी जाऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचा आहे. त्यामुळेच, मुंबईत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांना हेवेदावे विसरुन वाद न करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. आता, राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपने (BJP) प्रतिक्रिया देत आम्ही 51 टक्के मतदानाची तयारी केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मतं मिळाली आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली ती मला माहिती नाही. पण, आमची तयारी झाली आहे. कोणीही आलं आणि लढलं तरीही 51% मत महायुती घेणार आहे, असा प्रबळ विश्वासच भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला. यावेळी,  एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार नाही. कारण जनतेने स्वीकारला आहे की, नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत. त्यामुळे, जनता विकासासोबत जाणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत व्यक्त केला आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भातील प्रश्नावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक असे विधान करतात. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही तयार आहोत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख सदस्य असणारा भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तयार आहेत. ते काय करणार हे माहित नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे असेही बावनकुळे यांनी म्हटलं.

लालूच देऊन भडकावत असतील – पेडणेकर

राज ठाकरे यांनी त्यांच्या हिमतीवर पक्ष स्थापन केला, चोरून पक्ष स्थापन केला नाही. राज ठाकरे सत्तेत नव्हते तरीपण त्यांच्यासोबत मनसैनिक आहेत. शिवसेना देखील जास्त वेळ सत्तेत नव्हती तरी पण शिवसैनिक सोबत आहेत. राज ठाकरे यांना वाटलं असेल की काही पदाधिकाऱ्यांना लालूच देऊन भडकवताहेत. म्हणून, राज ठाकरे यांनी म्हटलं असेल की हेवेदावे सोडा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा

राज ठाकरेंविरुद्ध सर्वाच्च न्यायालयात धाव, कोर्टाच्या आदेशानंतर काढून घेतली जनहित याचिका

आणखी वाचा

Comments are closed.