अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
धुळे : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात सन 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने (Court) वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद अॅड. अमित जैन व अॅड. सुधाकर पाटील यांच्या मार्फत 12 ऑगस्ट 2016 रोजी दाखल करण्यात आली होती.
अंजली दमानिया यांनी सन 2016 मध्ये पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, रोहित शेटे, निलेश महाजन, नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला.
सदर प्रकरणात आज सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बी.डब्लू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून 23 सप्टेंबर पर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 सप्टेंबर 2025 रोजी आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव
दरम्यान, अंजली दमानिया यांनी गेल्या काही महिन्यात महायुती सरकारमधील गंभीर आरोप करत त्यांच्याविरुद्ध न्यायालयाही धाव घेतली आहे. बीडमधील नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सरकारवर दबाव आणला होता. त्यावेळी, देखील दमानिया यांनी अनेकदा एकनाथ खडसेंविरुद्धच्या लढाईचा उल्लेख केला होता. मी नेहमी सत्याची बाजू घेते, कुणाच्या दबावाला बळी न पडता आपलं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
आणखी वाचा
Comments are closed.