सोलापुरात भाजपची शिंदेंच्या शिवसेनावर कुरघोडी; शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश निश्चित
सोलापूर : राज्यातील राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडी आणि पक्षप्रवेश होत आहेत. महायुतीमध्ये नाराज असलेले माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या भावाने शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून लवकरच त्यांचा भाजप (भाजप) प्रवेश होत आहे. सोलापुरात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री नाताजी सावंत यांच्या भावाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आपल्या गटासह लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे, आधीच शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ कमी असलेल्या किंवा एकही आमदार नसलेल्या सोलापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असून सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. तर, दिलीप कोल्हे हे सोलापूरचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता येत्या दोन दिवसात समर्थकांसह हे दोन्ही पदाधिकारी व सोलापुरातील नेते भाजपमध्ये करणार प्रवेश आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला असून आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी राहा, असा उपरोधिक टोला लगावला. शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे महायुती सरकारमध्ये मंत्री राहिले होते. विशेष म्हणजे शिवसेनेतील बंडामध्येही त्यांचा हिरिरीने सहभाग होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अधिवेशनातही त्यांचा सक्रीय सहभाग दिसून आला नाही. आता, त्यांच्या भावाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : पुण्यावरुन लग्नाला जाताना चारचाकी वाहून गेली, एकाचा मृत्यू, तिघांना वाचवलं
आणखी वाचा
Comments are closed.