शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार, पण शहर ठप्प होईल असे….; जरांगेंच्या आंदोलनावर राज्य सरकार

मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची मुख्य मागणी असून, त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि हजारो समर्थक त्यांच्यासोबत असणार आहे. विशेष म्हणजे, एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना, त्याच दरम्यान हे आंदोलन होणार असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे जरांगे यांना आंदोलन पुढे ढकला, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यातच न्यायालयाने मनोज जरांगे यांना मुंबईत येऊन आंदोलन करण्यास नकार दिला आहे. आता मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारची भूमिका समोर आली आहे.

राज्य सरकारची भूमिका

शांततापूर्ण आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र शहर ठप्प होईल, अशा पद्धतीने आंदोलन करता कामा नये. गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा पोलिसांवर मोठा ताण असून मोठ्या संख्येत जमाव आल्यास पोलिसांवरील ताण वाढेल, तसेच मोठी गैरसोय होईल, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठामच आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलनास न्यायालयाचा नकार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता, पूर्व परवानगीशिवाय मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करू शकत नाहीत, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लोकशाहीत असहमतीला स्थान आहे, मात्र आंदोलन ठरवलेल्या जागीच करावे लागते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईची दिनचर्या विस्कळीत होऊ नये, म्हणून राज्य सरकारने नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा देण्याचा विचार करू शकतो, असेही न्यायालयाने सूचित केले. परवानगी घेतल्यानंतर शांततापूर्ण आंदोलनास हरकत नाही, मात्र सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. एमी फाउंडेशनकडून जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीनंतरही मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठामच राहिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुढील धोरण ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

अंतरवाली सराटीच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त वाढवला

तर बीड येथील जमावबंदीच्या आदेशानंतर अंतरवाली सराटीच्या वेशीवर आणि वडीगोद्री येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी गेवराई येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी उपोषण आंदोलन झालेल्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानंतर वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीच्या वेशीवर RCP आणि SRPF च्या प्रत्येकी दोन कंपन्या ,5 डी वाय एस पी, 8 पी आय सह 266 अधिकारी कर्मचारी आणि 165 होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Gunaratna Sadavarte VIDEO : किती माजलाय जरांग्या, डंके की चोट पे सांगतो, तू आंदोलन करु शकत नाहीस; गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका

आणखी वाचा

Comments are closed.