मुदत संपली, लगेच मुदतवाढ मिळाली; मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सुरूच, उद्याही गर्दी होणार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरेंग पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी हायकोर्टाने दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मराठा आंदोलकांकडून आज करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम व अटींच्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांच्या आंदोलनास परवागनी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाचा आता त्यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून आजचा प्रकार पाहता काही नियम व अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच भाषण करताना आंदोलनाबाबत भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहतूककोडींकडे पोलिसांनी दाखवले बोट

जरांगे पाटलांच्या आंदोलनात नियमा पेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित होते, तर वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहने रस्त्यात उभी करत वाहत कोंडी करण्यात आली. काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहने अडवून धरत होते. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होईल या परिस्थितीनुसार आंदोलकांकडून पाऊले उचलली जात होती, या सर्व परिस्थितीकडे बोट दाखवत नियम व अटींच्या आधारे पोलिसांकडून पुढील मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली,

आंदोलक वाशीच्या दिशेने रवाना

आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनासाठी जे आंदोलन आले ते आता वाशीच्या दिशेने निघाले आहेत. बहुमतांशी आंदोलकांची तिथेच राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, आज दिवसभर मुंबईत आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते आता वाशीच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत ईस्टर्न फ्री वे सुद्धा आता मोकळा झाला आहे, कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी राहिली नाही. एका मागे एक आंदोलकांच्या गाड्या आणि टेम्पो हे वाशीच्या दिशेने जात आहेत.

जरांगेना अटक करा – सदावर्ते

मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचे पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच, अटी व शर्तींचे पालन न केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही सदावर्तेंनी केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे समर्थन केले आहे, त्यांनी भाषण करताना जरांगेंच्या आंदोलनावरुन राजकारण केल्याचं सांगत त्यांच्याही अटकेची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी ज्या प्रकारे नियमांचा आणि अटींचा भंग केला, ते बघता योग्य ती कारवाई करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्याकडे केली. त्यासाठी, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय जाधव, बजरंग आप्पा सोनवणे यांच्यावरही सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा

Gunratna Sadavarte: मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई व्हावी; गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव

आणखी वाचा

Comments are closed.