नवी मुंबईजवळ तिसरी मुंबई, तर वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई उभारणार : देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, मुंबई मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं लोकार्पण आणि मेट्रो वन ॲपच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई उभारणार असल्याचं जाहीर केलं.
नवी मुंबई विमानतळ नवभारताचं प्रतीक
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस, गेले 10 वर्ष मोदींच्या नेतृत्त्वात ज्या गोष्टी सांगतो आहोत, त्या प्रत्यक्ष लोकार्पित होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आपलं विमानतळ नवभारताचं प्रतीक आहे. याची संकल्पना 90च्या दशकातील होती. मुंबईहून पुण्याला जाताना बोर्ड लागलेला दिसायचा.काहीच पुढं व्हायचं नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मोदींच्या नेतृत्त्वात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आलं.आम्ही मोदीजींना विनंती केली. आपलं प्रगती आहे, त्यात नवी मुंबईचं विमानतळ घ्यावं, अशी विनंती केली. मोदींनी लगेचच नवी मुंबई विमानतळ प्रगतीमध्ये घेतलं. प्रगतीच्या अतंर्गत हे विमानतळ घेतल्यानंतर, 8 एनओसी हव्या होत्या, ज्या मिळत नव्हत्या. प्रगतीच्या बैठकीपूर्वी 7 एनओसी आल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 15 दिवसात आठवी एनओसी आली. हे मोदींमुळं झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
नवी मुंबई विमानतळ 9 कोटी प्रवासी हाताळू शकेल, हे विमानतळ इंजिनिअरिंग मार्बल आहे. नदी परिवर्तित करावी लागली, डोंगर क्लिअर करावं लागलं. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात हे विमानतळ महत्त्वाचं योगदान देईल. महाराष्ट्राचा जीडीपी 1 टक्क्यानं वाढेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे देशातील पहिलं विमानतळ आहे, ज्या विमानतळाला वॉटर टॅक्सी मिळणार आहे. वॉटर टॅक्सीतून थेट गेट वे ऑफ इंडियाला जाता येणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट 40 किमीची अंडरग्राऊंड मेट्रो मोदींच्या आशीर्वादानं पार करत गेली. देशातील सर्वात मोठी अंडरग्राऊंड मेट्रो आहे. ही मेट्रो करत असताना अनेक अडथळे आले. ते पार करुन मेट्रोचं काम पूर्ण झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
मोदीजींनी ट्रान्सपोर्टेशन यंत्रणेचं इंटिग्रेशन झालं पाहिजे, असं सांगितलं होतं. मेट्रो वन ॲपच्या मोदींच्या हस्ते लाँच करतोय. त्या मेट्रो वन ॲप वर मेट्रो, बस, वॉटर टॅक्सी, लोकल रेल्वे उपलब्ध होईल. याद्वारे मुंबईला सुगम करण्याचं काम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
STEP ची सुरुवात
मोदीजींनी कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या कौशल्य विकास मंत्रालयानं STEP चा कार्यक्रम हाती घेतला. नव्या संधी तरुणाईला मिळाव्यात म्हणून शॉर्ट टर्म कोर्सेस हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई, वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई
वाढवण बंदराजवळ ऑफ शोअर विमानतळ तयार करणार आहोत. नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई निर्माण होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तिसरी मुंबई प्रकल्प काय?
तिसरी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करत रस्ते उभारणार आहे. नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी सिडको मोठा खर्च करणार आहे.
वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई
वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारलं जाणार आहे. वाढवण बंदरासाठी एकूण 76220 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या बंदरावर 9 कंटेनर टर्मिनल उभारली जाणार आहेत.त्यापैकी 4 टर्मिनल 2029 तर उर्वरित 5 टर्मिनल 2024 पर्यंत उभारली जातील. या बंदराजवळ आणखी एक विमानतळ उभारलं जाणार आहे. याशिवाय चौथी मुंबई तिथं उभारली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
https://www.youtube.com/watch?v=YME7NBXXNWQ
आणखी वाचा
Comments are closed.