आरबीआयची मोठी कारवाई, साताऱ्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द, धारशिवच्या एका बँकेवर निर्बंध
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्व बँकांची मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. देशातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर नियामक म्हणून आरबीआय जबाबदारी पार पाडते. बँकांच्या किंवा फायनान्स कंपन्यांच्या कामकाजात त्रुटी आढळल्यास आरबीआयकडून कारवाई केली जाते. 7 ऑक्टोबरला जारी केलेल्या विविध प्रसिद्धीपत्रकानुसार आरबीआयनं सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. तर द शिरपूर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिरपूरवरील निर्बंध कायम ठेवलेत. याशिवाय समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर आणि समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उस्मानाबाद (धाराशिव) या बँकांवर निर्बंध घातले आहेत.
जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द
जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड, साताराचा परवाना आरबीआयनं 30 जून 2016 ला रद्द केला होता. त्यानंतर 23 ऑक्टोबर 2019 ला बँकेच्या अर्जावरुन तो पुन्हा बहाल करण्यात आला होता. अपिलेट प्राधिकारणानं बँकेच अपील मान्य करुन बँकेच्या 2013-14 च्या आर्थिक स्थितीचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. आरबीआयनं फॉरेन्सिक ऑडिटर नेमला होता. बँकेच्या असहकार्यामुळं ऑडिट पूर्ण होऊ शकलं नाही. बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 च्या विविध कलमांनुसार बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची साधनं नाहीत, हे कारण देण्यात आलं आहे. जिजामाता महिला सहकारी बँक विविध नियमांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली. बँक सध्या ठेवीदारांची पूर्णपणे परत करु शकत नाही. आरबीआयनं महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचे आदेश दिलेत. लिक्वीडेशन डीआयसीजीसीच्या तरतुदीनुसार जवळपास 94.41 टक्के ठेवी विम्याच्या संरक्षणात येतात. ज्यांना डीआयसीजीसीकडून 500000 पर्यंतची रक्कम परत मिळू शकते.
धाराशिवच्या समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध
आरबीआयनं बँकिंग कायदा 1949 च्या विविध तरतुदीनुसार समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, उस्मानाबादवर निर्बंध घातलेत. बँकेला आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय कर्ज देणे, नुतणीकरण करणे, गुंतवणूक करणे, ठेवी स्वीकारणे यास मनाई केली आहे. आरबीआयच्या आदेशाशिवाय बँकेची मालमत्ता विकण्यासही मनाई केली गेलीय. आरबीआयनं या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलेला नाही. आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांमध्ये वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी बँकेचं कामकाज सुरु राहील. आरबीआयनं या बँकेसाठी 6 महिन्यांसाठी हे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान, सोलापूरच्या समर्थ सहकारी बँक लिमिटेडवर देखील आरबीआयनं निर्बंध घातले आहेत. द शिरपूर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शिरपूरवर यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढवण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.