पुण्यातील जैन समाज माझ्यासोबत, जमीन व्यवहाराशी माझा संबंध नाही, मुरलीधर मोहोळांनी आरोप फेटाळले
पुणे जैन बोर्डिंग हाऊस आणि मुरलीधर मोहोळ पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी (Jain Boarding house land) माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. गोखले बिल्डर्सच्या (Gokhle Builders) दोन कंपन्यांमधून मी बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. मी 30-35 वर्षे राजकारणात आहे. एका गोष्टीचं वाईट वाटतं की, एका चुकीच्या बातमीने राजकीय कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होऊ शकते किंवा एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते, असे मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीसंबंधी झालेल्या आरोपांवर सविस्तरपणे स्पष्टीकरण दिले. (Pune news)
मी गेले चार-पाच दिवस पुण्याबाहेर होते. मी आता केवळ मला निवडून दिलेल्या पुणेकरांच्या मनात कोणतीही शंका उत्पन्न होऊ नये, यासाठी बोलत आहे. राजू शेट्टी यांनी माझ्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराबाबत आरोप केले. राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. एरवी ते दिल्लीत माझ्याकडे कामासाठी येतात. त्यांनी माझ्यावर इतका मोठा आरोप करताना मला विचारायला हवे होते. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. मात्र, राजू शेट्टींचा मी आदर करतो. त्यांना जी माहिती देण्यात आली त्याआधारे त्यांनी माझ्यावर आरोप केले, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
गोखले आणि जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्ट यांच्यातील व्यवहार बेकायदा असेल तर त्यावर न्यायालय निकाल देईल. पण मुरलीधर मोहोळ यांनी 3000 कोटी रुपयांची जमीन 300 कोटीत हडपली, असे आरोप झाले. पुण्यात किंवा कुठेही मोकळ्या जागेचा भाव 20 हजार स्क्वेअर फिट यापेक्षा जास्त नाही. मुंबईतील मलबार हिललाही एवढा रेट नाही. मग जैन बोर्डिंग हाऊसच्या 1 लाख 20 हजार स्क्वेअर फिट इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेची किंमत 3000 कोटी रुपये कशी असू शकते, असा सवालही मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला.
Pune News: जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार कसा झाला?
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचे खरेदी खत झाले त्यामध्ये गोखले बिल्डर्सचे नाव आहे. माझ्यावर आरोप झाला की, मी गोखले बिल्डर्सचा भागीदार आहे. मी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते की, मी शेती आणि बांधकाम व्यवसाय करतो. मुळशी तालुक्यात माझी शेती आहे. मी 15-20 वर्षांपासून बांधकाम व्यवसाय करतो. मी अनेक कंपन्यांमध्ये भागीदार होतो.
राजकारणी माणसाने व्यवसाय करु नये का? मी सगळं प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामध्ये मी गोखले इस्टेट एलएलपी आणि गोखले फ्युचर एलएलपी या दोन्ही संस्थांमध्ये भागीदार होतो. 2022 आणि 2023 मध्ये मी आणि विशाल गोखले यांनी या दोन एलएलपी तयार केल्या. मी एलएलपीमधून बाहेर पडायच्या आधी दोन्हीमधून कोणताही व्यवहार झालेला नाही. 25 नोव्हेंबर 2024 रोजी मी दोन्ही एलएलपीचा राजीनामा दिला. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा व्यवहारात गेल्यावर्षी 16 डिसेंबरला विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये जमीन विकसकाला देण्याचा निर्णय झाला. 20 डिसेंबरला वृत्तपत्रांमध्ये तशी टेंडर नोटीस देण्यात आली. ही सगळी प्रक्रिया होताना जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने गोखले बिल्डर्ससोबत सेल डीड केले. 8 ऑक्टोबर 2025 रोडी गोखलेंनी जमीन विकत घेतली. हा व्यवहार होण्यापूर्वी मी गोखले बिल्डर्सच्या संस्थांमधून बाहेर पडलो होतो. मग या व्यवहाराशी मुरलीधर मोहोळचा संबंध कुठे आला, असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.