गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा..; मुंबईतून राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन


मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मनसेचा (MNS) मेळावा होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखली जात आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंना मुंबईतील मराठी माणसांना उद्देशून आवाहन केलंय. भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, हा गुजरातचा वरवंठा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्या खाली घेतले जाईल, असे म्हणत राज ठाकरेंना मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे.

मी बुलेट ट्रेन ला विरोध केला होता तो पट्टा बघा, भौगोलिक पट्टा बघा आहे. तिथे आता नवे विमानतळ तयार करतील, सांताक्रुझचे विमानतळ आहे, तेथील सगळे ऑपरेशन कमी करणार आणि ते नवी मुंबईला नेणार असे भाकीत राज ठाकरे यांनी वर्तवले. इथले सगळे कार्गो काढणार आणि वाढवणला नेणार आणि मग सगळी जमीन अदानीच्या घशात घालणार, असा आरोप राज ठाकरे यांनी राज्यातील भाजपा महायुती सरकारवर केला. तसेच,भाजपला मतदान करणारे मराठी लोक आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, हा गुजरातचा वरवंठा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हालाही त्या खाली घेतले जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

सगळ्या गोष्टीत अदानीच, रस्ते, भोगदे सगळीकडे तेच आहे. आता नेशनल पार्कचे जंगल तोडणार आणि प्रकल्प टाकणार, आदिवासी यांना हटविणार असे म्हणत राज ठाकरेंनी विविध प्रकल्पावरून भूमिका मांडली. मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही, पण प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर टाकून होत असेल तर मी खपवून घेणार नाही, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय. मुंबईतील हे कोस्टल रोड तुमच्यासाठी नाही आहे, आमचेच शेण खात आहेत, आमचीच मराठी माणसे यांना जमिनी देत आहेत. आमचीच मराठी माणसे दलाल म्हणून यांना जमिनी देत आहेत. केंद्र हातात आहे, राज्य आहे, उद्या पालिका आणि परिषदा गेल्या ना की रान मोकळे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. मतदार याद्यात बोगस मतदार घुसवून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.