Video: 34 मजल्यांचे 2 टॉवर, माझ्याकडे डिझाईन; 2700 कोटी खिशात, धंगेकरांचे मोहोळांवर गंभीर आरोप
पुणे : शहरातील कोथरुड (Pune) येथील जैन बोर्डिंग जागेच्या विषयावरुन प्रकरण चांगलच तापलं असून माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (रवींद्र धंगेकर) यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहायचं, एकही वीट हलू द्यायची नाही, असे म्हटले आहे. महावीर जयंतीदिनी तुम्ही तिथं दर्शनाला जाता आणि तेच देऊळ तुम्ही गहाण ठेवता, असे धंगेकर यांनी म्हटले. सगळ्यांनी कांड करुन जैन समाजाची ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार 2700 कोटींच्याही पुढचा आहे. कारण, यातील तिघेही कोथरुडचेच आहेत, ते तिघेही तुमचेच आहेत, असा आरोप धंगेकर यांनी केलाय. तसेच, येथील जागेवर 34 मजल्यांचे दोन टॉवर उभारण्यात येणार होते, असेही धंगेकर यांनी म्हटलं.
जैन समाज बोर्डिंग जागेच्या विषयात समोर आलेल्या गोष्टी योगायोग होत नसून त्या नियोजित आहेत. या प्लॅनिंगमध्ये तुमचाही सहभाग होता, सगळं अंगलट आल्यानंतर मी गोखले इंस्टीट्यूटमधून बाहेर पडलोय असं ते म्हणतात. मात्र, नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, मी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही देणार आहे, असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं. तसेच, तुम्ही राजीनामा दिला म्हणता, मग आजही पोर्टलला बडेकर आणि गोखले यांचे भागिदार तुम्हीच दिसत आहात. याशिवाय या लोकांवर कारवाई करणार असं तुम्ही अद्यापही म्हटलं नाही. त्यामुळे, या कारवाईच्या मागणीसाठी मी रस्त्यावर येणार असल्याचा इशाराही धंगेकर यांनी दिलाय.
34 मजल्यांचे दोन टॉवर
दरम्यान, येथील जागेवर 34 मजल्यांचे दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत, या टॉवरचं डिझाईन देखील तयार आहे. मी आजच ते डिझाईन जनतेसमोर आणणार आहे, 2700 कोटी यातून तुम्हाला मिळणार आहेत, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
300 कोटी रुपयांत 3000 कोटींची जमीन
अर्धातास प्रेस घेउन बडबड केली पण गडी एकदा पण म्हंटला नाही की हे जैन मंदिर वाचलं पाहिजे, हा व्यवहार थांबला पाहिजे. आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचे वाटते की, आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत गहाण ठेबून 70 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. मंदिर आणि हॉस्टेलची 3000 कोटीची प्रॉपर्टी 300 कोटी रुपयात खिशात घातली आणि आमचा खासदार ना जैन मंदिराबद्दल काही बोलत आहे ना, हा व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करत आहे, असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय. तसेच, जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे, आणि या छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले.
रविंद्र धंगेकरांचे ट्विट
ते वेगवेगळे विषय काढून लक्ष विचलित करतील, आपण मात्र #SaveHND मुद्द्यावर ठाम राहायचं. समस्त पुणेकर सगळ्या जैन समाजाच्या सोबत आहेत, कारण आज वेळ जैन समाजावर आली आहे. याकाळात आपण एकत्र नाही आलो तर उद्या सर्वांची धार्मिकस्थळे अशीच लाटली जातील, असे ट्विट रविंद्र धंगेकर यांनी केलं आहे. तसेच, I Repeat … एकही वीट हलवू द्यायची नाही, असेही धंगेकर यांनी म्हटलं आहे. आता, यासंदर्भात विचारल्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
धर्मादाय आयुक्तांकडून स्टेटस्को
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेसदर्भातील वादावर आता धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्याकडे अती तातडीची सुनावणी आज मुंबईतील आयुक्तालयात पार पडली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी अत्यंत भक्कम व कायदेशीर मांडली. त्यावर, या विषयात धर्मादाय आयुक्तांनी तुर्तास स्टेटस्को दिला आहे. या सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन तसेच इतर जैन बांधव उपस्थित होते. संपूर्ण जैन समाजाचे लक्ष या निर्णायक सुनावणीकडे लागले असून, जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील लढ्याचा आज पहिला टप्पा होता.
आणखी वाचा
Comments are closed.