अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, न
अद्वय हिरे: मुंबईतील मंत्रालयात आज बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shinde Faction) एकही मंत्री उपस्थित न राहिल्याने मोठी खळबळ उडाली. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (मराठी) बैठकीत उपस्थित होते. बाकी सर्व शिंदे गटाच्या मंत्र्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या फोडाफोडीवरून शिंदे गटाचे मंत्र्यांमध्ये नाराजी शिगेला पोहोचली असल्याची सूत्रांकडून मिळत आहे.
बैठक संपताच शिंदे गटातील सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दालनात गेले आणि “जे सुरू आहे ते योग्य नाही” असे सांगत त्यांनी सरळ नाराजी नोंदवली. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात (Nashik Politics) आणखी एक नवा ‘ट्विस्ट’ समोर आला. अद्वय हिरे यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का?
ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला, तर शिंदे गटाचे दादा भुसे यांच्यासमोर मालेगावमध्ये नवे राजकीय समीकरण उभे राहू शकते. भुसे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने ही चाल खेळल्याचे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे. त्यातच मंत्री उदय सामंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या घरी जाऊन बसल्याची माहिती समोर येतेय. सामंतांनी चव्हाणांच्या घरी अचानक हजेरी लावल्यामुळे अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता अद्वय हिरे यांचा भाजप प्रवेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Advay Hiray Joins BJP: कोण आहेत अद्वय हिरे?
नाशिक–मालेगाव परिसरात हिरे घराण्याचा प्रभाव प्रचंड आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत हिरे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव नवख्या दादा भुसे यांनी करून राजकारणातील समीकरणेच बदलून टाकली. त्यानंतर 2009 आणि पुढील काळात भुसे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचा भगवा कायम टिकवला. हिरेंना 2014 नंतर भाजपमधील कामकाज आणि मोदींच्या नेतृत्वाची ओढ निर्माण झाली. याच काळात अद्वय आणि अपूर्व हिरे दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली. अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 रोजी शिवबंधन हातात बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी मालेगावच्या राजकारणात आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अद्वय हिरे यांनी शिवसेना मंत्र्यांविरोधात उघड भूमिका घेतली होती. नंतर शिंदे–भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाच्या दादा भुसे यांना 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत कडवे आव्हान दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. आता अद्वय हिरे हे पुन्हा एकदा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा एकदा भुसे विरुद्ध हिरे हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.