Video: अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, पण..; व्हिडिओनंतर बाळाराजे पाटलांकडून माफी


सोलापूर : जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत (Nagarparishad) निवडणुकीत यंदा चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. गेल्या 60 वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होत असल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाल्याने येथील निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध होत असल्याचं स्पष्ट झालं. थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील (Rajan patil) समर्थकांनी जल्लोष केला. त्यामध्ये, राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच (Ajit pawar) चॅलेंज केले होते, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार समर्थकांनी राजन पाटलांवर थेट हल्लाबोल केला. मात्र, आता राजन पाटील व बाळराजे पाटील या बाप-लेकाने अजित पवारांची माफी मागितली आहे.

अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त करतो, असे म्हणत अजित पवारांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. पण, अजितदादांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करत होते असे म्हणत उमेश पाटलांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, असेही बाळराजे पाटील यांनी म्हटलं. तत्पूर्वी राजन पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि पवार कुटुंबीयांची माफी मागितली.  भावनेच्या भरात बाळराजेंकडून नकळत काही अपशब्द गेले, ते अजिबात समर्थनार्थ नाहीत. अजित दादांनी पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो, असे म्हणत बाळराजे यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर त्यांचे वडिल आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

अनगरमधील नेमका प्रकार काय?

अनगर नरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्राजक्ता पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे, राजन पाटील यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि समर्थकांनी नगरपंचायतीसमोर विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी, बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज दिलं. अजित पवार.. कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असे म्हणत इशारा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थकही चांगलेच संतप्त झाले होते. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी थेट राजन पाटलांवरच हल्लाबोल केला. त्यानंतर, राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी मीडियासमोर येऊन माफी मागितली.

हेही वाचा

Rajan Patil : अजितदादा माफ करा, पदरात घ्या…; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!

आणखी वाचा

Comments are closed.