गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर, रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजलं जाणाऱ्या पुण्यात (Pune) वारंवार होणाऱ्या गंभीर गुन्ह्यावरुन पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जात असून खून, मारामाऱ्या, धमकी, अपहरण, खंडणीसारखे गुन्हे रोखणे पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात आंदेकर गँगच्या गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरलं होतं, त्यानंतर कोथरुडमधील निलेश घायवळ टोळीच्या गुंडगिरी व मारहाणीच्या घटनेवरुन पुण्यात तणावाचे वातावरण होते. आता, पुण्याच्या एका हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाला असून शस्त्रांचा धाक दाखवत हे हॉटेल लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, गुंडाना जामीन आणि नेत्यांना जमीन असे म्हणत पहिल्यांदाच नाव न घेता पार्थ पवारांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर सरकारी जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला कवडीमोल दराने देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर, या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं, विशेष म्हणजे अजित पवारांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आल होती. अखेर, तो व्यवहार रद्द करण्यात आला. मात्र, रोहित पवारांनी पुण्यातील गुंडगिरी आणि लँड माफियांच्या संदर्भाने ट्विट करत पहिल्यांदाच नाव घेता पार्थ पवारांना लक्ष्य केलं.
पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही? रात्रंदिवस पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून, हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरुन थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं. तसेच, गुंडाना जामीन आणि नेत्यांनी जमीन, असे म्हणत पार्थ पवार यांना लक्ष्य केलं आहे.
पुणेकरांनी किती दिवस दहशतीत राहायचं?
पुणेकरांनी किती दिवस दहशतीत रहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पाऊलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही? आणि पुणेकरांसाठी निर्भय वातावरण निर्माण करणार की नाही? असे अनेक सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
#गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन
पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे.. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही… pic.twitter.com/Ue7afQ8ujj
– रोहित पवार (@RRPSpeaks) 20 नोव्हेंबर 2025
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.