अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव; नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं


नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या (Election) आज 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, आता 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा (Voting) निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता माजी मंत्री तथा आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनीही निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.

कायदा सर्वांसाठी सारखा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो की निवडणूक आयुक्त असो ते संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. आम्ही राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे की, त्यांनी आर्टिकल 243 अंतर्गत राज्यच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणला पाहिजे. राज्य सरकार प्रस्ताव आणणार नसेल तर आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्याच्या  निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा प्रस्ताव आणू , असे काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.

राज्य सरकारला आमची भूमिका राजकीय वाटत असेल. पण, गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला सोडले तर याला काय म्हणायचे? खरतर निवडणूक आयोगाच्या भूमिकाच राजकीय आहेत. राज्य सरकार महाभियोग आणणार नसेल तर निवडणूक आयोग व राज्य सरकार यांचे साटेलोटे असल्याचे उघड होईल, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. गडचिरोलीत तहसीलदाराला  स्वतः निवडणूक आयोग एव्हीएमची बॅटरी बदलवायला सांगतात मग 18 दिवस ईव्हीएम सुरक्षित राहील का? याबद्दल आम्हाला शंका आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

हिवाळी अधिवेशन 1 महिन्यात घ्यावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विदर्भातून येतात, विरोधी पक्षात असतांना ते दोन महिने हिवाळी अधिवेशन चालावे अशी मागणी करायचे,आता दोन महिने नाही, तर एक महिना हिवाळी अधिवेशन राहावे ही आमची मागणी आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी केवळ दिवसांच्या अधिवेशन प्रक्रियेवरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.

सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली

अतिवृष्टी अनुदानाचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारल्यानंतरही नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले होते ते कशाला ? फक्त राजकारण करायला गेले होते का?. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रस्ताव आणला जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झाले असतांना भाजप सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही, यातून भाजप शेतकरी विरोधी आहे हे त्यांनी दाखवून दिल्याचे पटोले यांनी म्हटले.

डॉक्युमेंट्रीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात घेऊ

दरम्यान, हे सरकार राज्यात जाती-जातीत द्वेष निर्माण करत आहे. राज्य सरकार पेशवाईसारखे वागत आहे. जर महात्मा फुले यांच्यावरील डाक्युमेंट्रीची फाईल मंत्रालयातून गायब होत असेल तर राज्यात काय परिस्थिती आहे हे लक्षात येईल. हा प्रश्न पण हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा

सागलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक

आणखी वाचा

Comments are closed.