धक्कादायक! शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री बीडमध्ये लुटले, ट्रकचालकाने सांगितला थरार


बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड (Beed) जिल्ह्यातील गुंडगिरी आणि गुन्हेगारी चांगलीच चव्हाट्याव आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर येथील परळी आणि बीड जिल्ह्यातील गुंडगिरी व दहशतीचा मुद्दा समोर आला. याप्रकरणी, आमदार धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह त्याचे साथीदार अटकेत आहेत. दरम्यान, येथील अनेक गुंडांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचं पाहायला मिळत नाही. कारण, तेलंगणातून बीडमार्गे शिर्डीला (shirdi) देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ भररस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचे समोर आलं आहे. एका ट्रक चालकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. चोरट्यांच्या हाती शस्त्र असल्याने त्यांना रोखण्याची हिंमत ना प्रवासी भाविकांची झाली, ना माझा झाली, असेही ट्रक चालकाने स्वत: बनवलेल्या एका व्हिडिओतून सांगितलं आहे.

तेलंगणा येथील शिवप्रसाद पौने आपल्या कुटुंबासह खासगी वाहनाने शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान, बीडमार्गे प्रवास करत असताना त्यांचे वाहन गेवराई जवळील गढी येथे थांबले असता चोरट्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यावेळी लोखंडी रॉडसह अन्य हत्याराने पौने कुटुंबाला धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र इतर दागिने चोरट्यांनी काढून घेतले. तसेच, पुरुषांच्या गळ्यातील चैन आणि अंगठ्या असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हिसकावून चोरटे पसार झाले. याप्रकरणी, भाविक शिवप्रसाद यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, बीडमध्ये पवनचक्की कंपन्यांना खंडणी मागणे, चोऱ्या, दमदाटी यांसारख्या घटना चर्चेत असताना आता भररस्त्यात, महामार्गावर खासगी वाहनांना अडवून केली जाणारी लूट गंभीर बाब असून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविण्याची आणि अशा गुंडांना धडा शिकविण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा

जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?

आणखी वाचा

Comments are closed.