ठाकरेंच्या युती घोषणावेळी संजय राऊतांना खास खुर्ची, मग बाळा नांदगावकर कुठे? मोठी माहिती समोर
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशातील राजकीय नेत्याचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आज शिक्कामोर्तब झालं. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली असून मराठी माणसासाठी, मुंबईसाठी (Mumbai) सर्वांनी युतीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन राज ठाकरे केले. तसेच, मुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार असेही त्यांनी म्हटले. पत्रकार परिषदेला राज-उद्धव हे दोघे बंधू आणि त्यांच्या बाजुला शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत हे तिघेच उपस्थित होते. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या शेवटी दोन्ही बंधूंनी संजय राऊतांना दोघांमध्ये घेऊन फोटोही काढले. त्यामुळे, या युतीच्या घोषणेवेळी बाळा नांदगावकर (Bala nandgaonkar) कुठे होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली, त्यावेळी बाळासाहेबांना भेटून माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंसोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर, सातत्याने दोन्ही बंधूंनी एकत्र येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर, विविध माध्यमांना मुलाखती देतानाही त्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. एबीपी माझाच्या मुलाखतीतही त्यांनी ही आठवण सांगितली होती. 2017 साली जेव्हा बाळासाहेबांना ते भेटले होते, तेव्हा राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. मी पक्ष सोडून गेलेला माणूस, पण माझा नेता माझ्याबद्दल विचारतो, असे सांगताना बाळा नांदगावकर भावूकही झाले होते.
मी लीलावती रुग्णालयात बाळासाहेबांना शब्द दिला होता, शेवटपर्यंत मी दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन. त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नाही, पण महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी ह्या दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे, त्या दिवशी माझं राजकारण संपलं तरी चालेल, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं. मात्र, आज युतीची अधिकृत घोषणा होत दोन भाऊ एकत्र आले. पण, ह्या युतीसाठी प्रयत्न करणारे, युतीचे शिल्पकार बाळा नांदगावकर दिसले नाहीत, त्यामुळे ते कुठं होते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, ते आजारी असल्याने आजच्या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित राहू शकले नाहीत.
तब्येत बरी नसल्याने ते अनुपस्थित
बाळा नांदगावकर यांची तब्बते बरी नाहीय, कालपासून तब्बेत ठिक नसल्यामुळे आज ते युतीच्या घोषणेवेळी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते अशी माहिती मिळाली आहे. युतीसाठी जसं संजय राऊतांनी प्रयत्न केले, तसेच बाळा नांदगावकर हे सुद्धा युतीचे शिल्पकार आहेत. कारण राज उद्धव यांना एकत्र आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणार, असा शब्द बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव आज ते उपस्थित राहू शकले नाहीत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.