राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास की मविआची रणनीती !
सोलापूर : नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता, मागील काही वर्षांत प्रचंड राजकीय उलथापालथ अनुभवलेल्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर, आज भाजपच्या (BJP) आक्रमक राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका – या तिन्ही पातळ्यांवरील सत्तासमीकरणे पाहता सोलापूरची ही निवडणूक (Election) केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्यस्तरीय राजकारणाला दिशा देणारी ठरणार आहे.
1860 साली अस्तित्वात आलेल्या सोलापूर नगरपालिकेला 1963 साली महापालिकेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर अनेक दशकांपर्यंत महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहरात काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत ठेवली. मात्र 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने इतिहास रचत काँग्रेसची सत्ता उलथवून लावली आणि सोलापूर महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झाला.
गत 2017 च्या निवडणुकीत संख्याबळ कसं?
2017 च्या निवडणुकीत 102 जागांपैकी भाजपला 49 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना 21, काँग्रेस 11, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4, बसपा 4, माकप 1 अशा प्रकारे पक्षीय बलाबल होते. काँग्रेसची अवस्था इतकी बिकट झाली होती की विरोधी पक्षनेताही शिवसेनेचा होता. हीच निवडणूक सोलापूरच्या राजकारणात टर्निंग पॉईंट ठरली. मात्र खरी राजकीय उलथापालथ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तत्कालीन भाजप खासदारांचा पराभव करत काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्या. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा सोलापूरमध्ये पुनरागमन केल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु अवघ्या काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे पालटले.
विधानसभेनंतर पुन्हा चित्र बदलले
ज्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून काँग्रेसने अनेक वर्षे बालेकिल्ला तयार केला होता, त्याच मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे विजयी झाले. इतकेच नव्हे तर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपने जिंकत काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निकालांनंतर सोलापूर जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष म्हणून पुढे आला.
सोलापुरात भाजपचं मिशन लोटस
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात भाजपने आक्रमक भूमिका घेत ‘मिशन लोटस’ राबवायला सुरुवात केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांसह मित्र पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दिग्गज नेते असलेले माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्यासह डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांच्यासारखे विश्वासू नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची सोलापूर शहरात मोठी वाताहत झाली आहे.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, इतर पक्ष
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने सोलापुरात आक्रमक राजकीय रणनीती अवलंबल्यामुळे विरोधी पक्ष संघर्ष करताना दिसत आहेत. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मनसे आणि माकप यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्ष यांनाही सोबत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे महायुतीतील भाजप व्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशा बहुकोनी लढतीत रूपांतरित होण्याची शक्यता आहे. 3 मार्च 2022 पासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकांच्या माध्यमातून शहराचा कारभार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या अभावाबद्दल नाराजी आहे. ही नाराजी निवडणुकीत कितपत कोणाच्या विरोधात जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाणी प्रश्न, बेरोजगारी प्रश्न आजही कायम
सोलापूर शहराचा सामाजिक आणि भौगोलिक विचार करता हे शहर कामगारबहुल आहे. एकेकाळी ‘गिरणगाव’ म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील कापड गिरण्या बंद पडल्या आणि शहराचे स्वरूप बदलले. सुमारे 12 लाख लोकसंख्या असलेले सोलापूर 178.57 चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे. दक्षिण भारताला जोडणारे प्रवेशद्वार म्हणून सोलापूरचे राजकीय महत्त्व मोठे आहे. दलित, लिंगायत, मुस्लिम, मराठा समाजाचे प्राबल्य असलेले सोलापूर शहर 26 प्रभागांमध्ये विभागलेले आहे. बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहर असल्यामुळे येथे मतदानावर सामाजिक समीकरणांचा मोठा प्रभाव दिसतो. शहरातील मुख्य प्रश्न आजही तेच आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पाण्याचा प्रश्न कायम आहे. आठवड्यातून एकदाच पाणी मिळते, अशी नागरिकांची तक्रार आहे. बेरोजगारी हा सर्वात गंभीर प्रश्न बनला आहे. तरुण नोकरीसाठी इतर शहरांकडे स्थलांतर करत असल्याने सोलापूर हे वृद्धांचे शहर बनत चालल्याची भीती व्यक्त केली जाते. रस्त्यांची दुरवस्था, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार हे मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी असणार आहेत.
भाजपाकडून प्रचारात विकासाचा मुद्दा
भाजपने मात्र विकासाच्या मुद्द्यावर जोरदार प्रचाराची तयारी केली आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी पाणी पाइपलाइन पूर्ण झाल्याचा दावा, 892 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर, 50 एकरांवर आयटी पार्कला मंजुरी आणि अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली सोलापूर विमानसेवा सुरू होण्याचा मुद्दा भाजप पुढे रेटणार आहे. मात्र विरोधकांचा आरोप आहे की कागदावर विकास झाला, प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, पाइपलाइन झाली तरी पाणी येत नाही, असे मुद्दे भाजपच्या विरोधात उभे केले जाणार आहेत. एकीकडे भाजपकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत, तर दुसरीकडे ऑपरेशन लोटसमुळे पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीचा धोका देखील आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपसाठी अंतर्गत समन्वय हे मोठे आव्हान ठरणार आहे.
एकूणच, सोलापूर महानगरपालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित न राहता, राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. भाजपची सत्ता अबाधित राहणार की महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरणार की राष्ट्रवादी, शिवसेना नवा पर्याय देणार याचे उत्तर येत्या निवडणुकीत सोलापूरकर देणार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.