उल्हासनगर महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार? बदललेलं समीकरण अन् सध्याचं राजकारण
उल्हासनगर महानगरपालिका बातम्या : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. शिवसेना, भाजपसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू करत निवडणुकीच्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजप आणि कॉंग्रेस यांचा भर शहरातील कोणत्या प्रभागातून कोण निवडून येऊ शकतो, याचा आढावा घेऊन त्यानुसार रणनीती ठरवण्यावर आहे.
उल्हासनगर महापालिकेची स्थापना
उल्हासनगरची स्थापना 1949 मध्ये झाली आणि 1 ऑक्टोबर 1960 रोजी उल्हासनगर नगरपालिकेची स्थापना झाली, ज्याचे रूपांतर 20 ऑक्टोबर 1996 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेत झाले. ही महानगरपालिका सिंधी हिंदू निर्वासितांनी वसवलेल्या या शहराच्या प्रशासनासाठी कार्य करते.
स्थापनेचा प्रवास :
1940 चे दशक: भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सिंधी निर्वासितांसाठी कल्याणजवळ हे शहर वसले, ज्याला 1949 मध्ये ‘उल्हासनगर’ नाव मिळाले.
1960 : उल्हासनगर नगरपालिकेची स्थापना झाली आणि अर्जुन के. बल्लानी पहिले प्रमुख बनले.
1996 : उल्हासनगर महानगरपालिका म्हणून उन्नती झाली (20 ऑक्टोबर 1996), आणि गणेश चौधरी पहिले महापौर बनले.
सध्याचं राजकारण
राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय मंडळी कामाला लागली आहे भाजप शिवसेना यांची युती होईल की नाही याबाबत शहरात चर्चा रंगली असून भाजपकडून स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी शिवसेनेकडून मात्र एकत्र निवडणूक लढवून महायुतीचा महापौर बसणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी टी ओ के, अर्थात ओमी कलानी टीम ने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे आमची शिवसेनेसोबत युती आहे मात्र भाजप बरोबर नाही असे ओमी कलानी टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे भाजप शिवसेना टीम ओमी कलानी हे एकत्र येतात का याकडे लक्ष लागले आहे .
आठ वर्षांपूर्वी 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध भिडले होते. त्यावेळी कलानी गट भाजपमध्ये गेल्यामुळे पहिले अडीच वर्ष महापालिकेत भाजपचा महापौर होता. मात्र त्यानंतर भाजपला सोडून शिवसेनेबरोबर गेल्याने अडीच वर्ष शिवसेनेची महापालिकेत सत्ता होती. सद्यस्थितीत महापालिका निवडणूक लागण्यापूर्वीच शिवसेना, कलानी आणि साई पक्ष हे एकत्र होत त्यांनी भाजपला आवाहन दिले आहे. मात्र अशा परिस्थितीत शिवसेना आणि भाजप ही महायुती एकत्र पालिका निवडणूक लढल्यास इलेक्शन फक्त दिखावा असेल साई पक्ष आणि टीम ओमी कलानी भाजप सेना एकत्र निवडणूक लढले तर यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरसेवकांची संख्या
2017 च्या उल्हासनगर महापालिका निवडणकी पूर्वी उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप सत्तेत होती. गुण्यागोविंदाने दोघांचे चांगले जमत होते. असे असताना मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप परस्परविरोधी लढणार असल्याने उल्हासनगरमध्ये ही काडीमोड घेण्यात आली. उल्हासनगरची जबाबदारी तत्कालीन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि श्वेता शालिनी यांनी स्विकारली. शिवसेनेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि भाजपची एक हाती सत्ता बनविण्यासाठी कलानी परिवाराशी संधी करत महापालिकेत 32 नगरसेवक निवडून आले. विरोधात असलेल्या शिवसेनेचे 25 नगरसेवक, साई पक्षाचे 11 नगरसेवक, आरपीआयचे 3 नगरसेवक, काँग्रेसचा 1 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक, भारिप बहुजन महासंघाचा 1 आणि पीआरपीचा 1 नगरसेवक निवडून आला होता.
पहिल्या अडीच वर्षातील सव्वा वर्षात मीना आयलानी या भाजपकडून महापौर झाल्या, तर उर्वरित सव्वा वर्षासाठी कलानींच्या सुनबाई पंचम कालानी या महापौर झाल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंचम कलानी किंवा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांना आमदारकीचे तिकीट भाजप कडून मिळेल असा कलानींचा विश्वास होता. मात्र ऐन वेळेला तत्कालीन पराभूत आमदार कुमार आयलानी यांनाच भाजपने पुन्हा तिकीट दिल्याने कलानी गटाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे 2019 ला झालेल्या महापौर निवडणुकीत कलानीच्या नऊ नगरसेवकांनी भाजपला धडा शिकवत शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांना महापौर बनवले.
तेव्हापासून कलानी आणि शिवसेना यांचे दोस्तीचे गटबंधन नावारुपास आले. या दोस्तीच्या गटबंधनात साई पक्ष हा देखील आता सामील झाला आहे. त्यामुळे शिवसेना, कलानी, साई पक्ष आणि इतर असा जवळपास 50 माजी नगरसेवकांचा गट कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकत्र केला आहे. या विरोधात भाजपकडे 20 ते 25 नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत सेना-भाजप हे महापालिका निवडणुकीत एकत्र लढल्यास 70 पेक्षा अधिक अनुभवी माजी नगरसेवक हे एका बाजूला होतील. यांच्या विरोधात मजबूत असा विरोधी पक्ष नसल्यामुळे निवडणूक हा फक्त दिखावा असेल. मात्र अशा परिस्थितीत भाजपला महापौर पद भेटणे मुश्किल होईल. त्यामुळे 2019 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा भाजपला घेता येणार नाही.
उल्हासनगर महापालिका पक्ष बलाबल…
एकूण – 78
सत्ता -शिवसेना
भाजप- टीओके – 31
शिवसेना-25
साई पक्ष-12
राष्ट्रवादी-04
काँग्रेस-01
रिपाई-02
भारिप-01
PRP-01
अपक्ष-01
हे ही वाचा :
Vasai-Virar Municipal Corporation News : वसई-विरार महापालिकेत कोणाचा महापौर? बविआ की भाजपा, बदललेलं समीकरण अन् सध्याचं राजकारण, A टू Z माहिती
आणखी वाचा
Comments are closed.