भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
जळगाव : भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार Eknath Khadse (एकनाथ खडसे) यांच्यातील शाब्दिक खडाजंगी काही केल्या थांबत नाही. नगपालिका निवडणुकीत भुसावळमध्ये झालेल्या पराभवानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेचं नाव घेऊन बोचरी टीका केली होती. भुसावळमधील (Jalgaon) पराभव हा अपशकुनी खडसेंमुळे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. जर भाजपचा पराभव माझ्यामुळे झाला तर ती आनंदाची बाब आहे, असा खोचक टोला खडसेंनी लगावला. तसेच, महापालिका निवडणुकीतील प्रभारी पद मला डावलले नसून संतोष चौधरी यांना दिलेलं पद मला विश्वासात घेऊनच दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संतोष चौधरी यांना जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचे प्रभारी पद घेण्याचा निर्णय हा मला विश्वासात घेऊनच घेण्यात आला आहे. आतापर्यंत कुठल्याही निवडणुकांमध्ये मी प्रभारी पद घेतलेलं नव्हतं . माझ्या प्रकृतीमुळे मी प्रभारी पद स्वीकारलेलं नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीतही पक्षाचे प्रभारी हे वेगळेच होते. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये गल्लीबोळांमध्ये फिरावे लागतं, प्रकृती कारणास्तव मला ते शक्य नाही, असे म्हणत एकनाथ खडसेंनी महापालिका निवडणूक प्रभारी पण डावलले नसल्याचं सांगितलं. तसेच, मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवत नव्हता. त्यामुळे, मुक्ताईनगरमध्ये आमचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटलं.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना अपशकुनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे सोयीनुसार बोलतात. मुक्ताईनगरमध्ये जर भाजपचा पराभव माझ्यामुळे झाला तर ती आनंदाची बाब आहे, असा खोचक टोलाही खडसेंनी लगावला. मी भाजपचा नव्हे, तर भाजपचा विरोधक आहे. मात्र,भुसावळमध्ये जो पराभव झाला तो गिरीश महाजन यांच्यामुळे झाला. जळगाव जिल्ह्यातही भाजपचा अनेक ठिकाणी पराभव झाला, मग या पराभवाला जबाबदार कोण? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली मग तेच या पराभवाला जबाबदार आहेत, असे म्हणत खडसेंचे गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचा निर्णय योग्यच
महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधात लढण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन उमेदवार उभे केले तर अशापर्यंत जाणं शक्य होईल. जागावाटपात कोणी दोन पावलं पुढे तर कोणी दोन पावलं मागे घेऊन निवडणुका पार पाडाव्या लागतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी जो पक्ष कमजोर असेल त्याला दुसऱ्या समविचारी पक्षाला सोबत घ्यावे लागते. पिंपरी चिंचवडसह सोलापूर व इतर काही ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेतली आहे. कारण, त्या ठिकाणी अजित पवारांचा प्रभाव आहे. त्या महापालिकांमध्ये अजित पवार हे भाजपसोबत नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे, असेही खडसेंनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.