पुण्यात भाजप अन् अजित पवारांना रोखण्यासाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणा

पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीला एकत्रित सामोरं जाण्यासाठी सर्वच पक्ष बैठका, चाचपणी, चर्चा करत आहेत, अशातच शिवसेना भाजप युतीत लढणार असल्याची चर्चा होती मात्र, त्यांच्यात अद्याप जागांचा तिढा सुटला नसल्याचं दिसून आलं आहे,तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाच सुत्र निश्चित करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती आहे. पुणे महापालिकेत १६५ जागा आहेत. त्यापैकी कॉंग्रेस (Congress), शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad pawar) पक्षाने प्रत्येकी ५० जागा लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून भाजप–शिवसेनेत तिढा कायम आहे. त्यामुळे अद्याप त्यांचं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागांचं अंतिम गणित ठरलेलं नाही

पुणे महानगरपालिकेत एकूण १६५ जागा असून त्यापैकी भाजप १२५ हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ १५ जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे, जो शिवसेनेला मान्य नसल्याचं समजतं. त्यामुळेच शिवसेना वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आरपीआय भाजपसोबतच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशी चर्चा सुरुवातीला होती. यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील पार पडल्या. मात्र घड्याळ या एकाच चिन्हावर लढण्याचा अजित पवारांचा आग्रह शरद पवार गटाला मान्य नसल्याने या चर्चांना सध्या तरी ब्रेक लागलेला आहे.

५०–५०–५० असा प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती

दरम्यान, पुण्यात महाविकास आघाडी पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात ५०–५०–५० असा प्राथमिक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. मनसेला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अद्याप महाविकास आघाडीचं अंतिम जागावाटप ठरलेलं नसून, बैठकींचं सत्र सुरूच आहे. पुण्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ नेतेही पुण्यात दाखल झाले असून, आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे

दुसरीकडे, महायुतीमध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने आणि राष्ट्रवादीचे गणितही न जुळल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र लढणार का? अशीही चर्चा रंगली आहे. अजित पवार गट शिवसेनेला ४० ते ४४ जागा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. मात्र यावरही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे एकूणच पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, की भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध महाविकास आघाडी,
अशी लढत होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.