शिंदेंच्या शिवसेनेतही घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत (Election) सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपातही मोठी घराणेशाही दिसून आली होती. नांदेडमधील लोहा नगरपालिकेत चक्क एकाच घरातील 6 जणांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे, भाजपवर घराणेशाहीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकांत यु टर्न घेतला आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्‍यांच्या मुलांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला. मात्र, या नेतेमंडळींच्या नातलगांना मैदानात उतरवलं आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या (मराठी) शिवसेना (Shivsena) पक्षातही चांगलीच घराणेशाही पाहायला मिळत आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची घराणेशाही समोर आली आहे. पक्षातील आमदार, खासदारांची मुलं आणि नातेवाईकांना मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, जवळपास 8 वार्डातून थेट आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेवर घराणेशाही आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असे म्हणत टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षात घराणेशाही पुढे नेल्याचं पाहायला मिळत आहे.

8 आमदार-खासदारांच्या घरातच उमेदवारी

शिवसेना शिंदे गटाकडून वॉर्ड क्रमांक 191 मधून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, वॉर्ड क्रमांक 169 मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांनाही तिकीट दिलं आहे. तसेच, चांदिवलीमधून वॉर्ड क्रमांक 163 मधून आमदार दिलिप मामा लांडे यांची पत्नी शैला लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चेंबूरमधून वॉर्ड क्रमांक 153 मधून आमदार तुकाराम कांते यांची सून तन्वी काते यांना उमेदवारी दिली आहे. अणुशक्ती नगर वॉर्ड क्रमांक 146 मधून आमदार तुकाराम काते यांची सून समृद्धी गणेश काते यांना शिवसेनेनं मैदानात उतरवलं आहे. भांडुप वॉर्ड 113 मधून आमदार अशोक पाटील यांचा मुलगा रुपेश अशोक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व वॉर्ड 73 मधून खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांना उमेदवारी दिली असून धारावीतून वॉर्ड क्रमांक 183 मधून शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रामुख्याने 8 जणांच्या कुटुंबातील सदस्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. यासह अनेक ठिकाणि माजी नगरसेवक आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकांच्या घरातच उमेदवारी दिल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

आणखी वाचा

Comments are closed.