तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण….
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 19 मधून उमेदवारी मिळाल्यानंतर आशुतोष नरेश म्हस्के यानं एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात आशुतोष नरेश म्हस्के यानं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ठाण्याचे खासदार आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष ठाण्यातील वॉर्ड क्रमांक 19 ड आनंदनगर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. आशुतोष म्हस्के याच्या नावाची चर्चा सुरु होताच, पक्षातून विरोध सुरु झाला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी आशुतोष म्हस्के याला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता.
आशुतोष नरेश म्हस्केची फेसबुक पोस्ट
विजय महाराष्ट्र!!
माझे वडील माननीय नरेश म्हस्के साहेब आणि मी ,आम्हा दोघांचाही जन्म ह्याच प्रभागातला. आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो. आनंद नगर, गांधी नगर कुष्ठरुग्ण वसाहत आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे आमचं घर ….परिवारच!!
माननीय म्हस्के साहेब महापौर झाल्यानंतर आणि मला समज आल्यापासून या प्रभागात मी जमेल ते आणि पडेल ते काम करत आलो आहे आणि प्रत्येक कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्वाभाविकपणे म्हस्के साहेब खासदार झाल्यानंतर माझ्या प्रभागातल्या या परिवारातील सदस्यांची मी त्यांचा प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा होती.
आम्ही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली लहानाचे मोठे झालो. त्यामुळेच मी निरपेक्ष आणि मनापासून काम कायमच करत आलोय.
शिवसेनेचा आणि माझ्या वडिलांचा तो वारसा मला मिळाला आहे.
या साऱ्या पाठीमागे कोणतीही अपेक्षा नव्हती. परंतु आनंदनगर आणि गांधीनगर तसेच आजूबाजूच्या परिसरामधील मधल्या लोकांच्या आग्रहस्तव त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मी अंगावर घेतली आहे.
निवडणुका आल्या तसा हा आग्रह अधिक वाढू लागला. परंतु पक्ष स्तरावरच्या अडचणी वेगळ्या असतात आदरणीय शिंदे साहेबांचाही काहीतरी नाईलाज झाला असेल.
शेवटी कुटुंबातल्या हट्टी मुलांचं लगेच ऐकलं जातं. समंजस मुलाला बरेचदा माघार घ्यावी लागते तसंच काहीसं झालं असेल.किंवा माझ्यात काहीतरी कमी असेल किंवा मी त्या योग्यतेचा नसेल….
माझा कोणावरही राग नाही. मी कायम काम करत आलो आहे आणि करत राहीन. पक्ष देईल ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या प्रभागातल्या माझ्या सर्व नागरिकांना मी एवढेच सांगेन….
तुमची नाराजी आणि खंत मी समजू शकतो. पण मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
तुमचे आशीर्वाद आणि साथ सदैव सोबत असू द्या.
नसेल मिळाली संधी तरी ताठ आहे कणा
पाठीवरती हात ठेवा, फक्त ‘लढ’ म्हणा..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
तुमचा,
आशुतोष नरेश म्हस्के
आणखी वाचा
Comments are closed.