सोलापुरात BJP आमदाराच्या भाऊजींना तब्बल 14 हजारांचे मताधिक्य; काँग्रेस शहराध्यक्षांनी लाज राखली
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेत भाजपने (BJP) एकतर्फी सत्ता मिळवली आहे. 75 पारचा नारा यशस्वी ठरवत सोलापूर महापालिकेत भाजपने तब्बल 87 जागावर विजय मिळवलाय. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे या त्रिकुटची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसतं आहे. भाजपचा दणदणीत विजय झाला असला तरी अनेक प्रभागात चूरशीच्या लढती देखील पाहायला मिळाल्या. भाजपचे प्रभाग 3 मधील उमेदवार संजय कोळी यांचा अवघ्या 19 मतांनी महापालिका (Solapur) निवडणुकीत विजय झाला. त्यांनी भाजपचे माजी सभागृह नेते आणि यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सुरेश पाटील यांचा पराभव केला. तर सोलापूर महापालिका निवडणुकीत (Election) भाजपचेच विनायक कोंड्याल हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. प्रभाग 12 अ मधून भाजपाकडून रिंगणात असलेले विनायक कोंड्याल यांना 16381 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीनिवास पोतन यांना अवघी 2230 मते मिळाली. त्यामुळे कोंड्याल हे तब्बल 14 हजार 151 मतांनी विजयी झाले.
भाजप आमदार देवेंद्र कोठेंचा महापालिकेत दबदबा, भावजी सर्वाधिक मताधिक्याने विजयी
सोलापूर महापालिकेत आमदार देवेंद्र कोठे यांचे बंधू प्रथमेश कोठे हे देखील मोठ्या मतधिक्यानी विजयी झाले. प्रभाग 10 ड मध्ये प्रथमेश कोठे हे तब्बल 12 हजार 486 मतांनी विजयी झाले. त्यांच्या पॅनलमधील प्रभाग 10 अ मधील उमेदवार उज्वला दासरी ह्या 12424, 10 ब मधील उमेदवार दीपक येलदंडी 11 हजार 13 मताधिक्याने विजयी झाले.
प्रभाग 12 मध्ये देखील आमदार देवेंद्र कोठे यांचा दबदबा कायम राहिला. आमदार देवेंद्र कोठे यांचे भावजी असलेले विनायक कोंड्याल सोलापुरात सर्वाधिक 14151 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. या संपूर्ण प्रभागात विरोधकांना अक्षरशः धूळ कोठे समर्थक भाजप उमेदवारांनी चारली. प्रभाग 12 ब मध्ये सारिका खजूरगी ह्या 12140, 12क मध्ये अर्चना वडनाल 11466, 12ड मध्ये सिद्धेश्वर कमटम हे 11466 मताधिक्यानी विजयी झाले.
प्रभाग 3 मध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रंजिता चाकोते यांनी देखील मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. रंजिता चाकोते यांना 15242 तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांना 3561 मते मिळाली. त्यामुळे रंजिता चाकोते यांचा तब्बल 11684 मटाधिक्याने विजय झाला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सासू माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांना मात्र निसटता विजय झाला. प्रभाग 18 अ मध्ये श्रीकांचना यन्नम अवघ्या 400 च्या फरकाने विजयी झाल्या.
अटीतटीच्या लढतीत केवळ 19 मतांनी उमेदवार विजयी
सोलापुरात अनेक प्रभागात अटीतटीचा सामना देखील पाहायला मिळाला. प्रभाग 3 ड मधील भाजप उमेदवार संजय कोळी आणि शिवसेना उमेदवार सुरेश पाटील यांच्यातली लढत सर्वाधिक चूरशीची राहिली. कोळी याना 8050 तर पाटील यांना 8031 मते मिळाली. अवघ्या 19 मतांनी संजय कोळी विजयी झाले. प्रभाग 7 क मध्ये देखील भाजप उमेदवार उत्तरा बरडे-बचूटे आणि शिवसेना उमेदवार मनोरमा सपाटे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. या सामन्यात मनोरमा सपाटे अवघ्या 88 मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग 5 ची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध भाजप बंडखोर असा तिहेरी सामना या प्रभागात झाला. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या चार ही उमेदवारांचा या प्रभागात विजय झाला. राष्ट्रवादीचे नेते आणि दलित चळवळीतील प्रभावी नेते असलेले आनंद चंदनशिवे याचं प्रभाग 5 मधून पराभूत झाले. प्रभाग 5 ड चे भाजप उमेदवार बिज्जू प्रधाने हे अवघ्या 835 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजप बंडखोर राजू आलूरे यांचा पराभव केला. तर मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग 14 ड मध्ये एमआयएम विरुद्ध काँग्रेस असा अटीतटीचा सामना झाला. काँग्रेसचे तरुण उमेदवार शोएब महागामी यांनी कडवी झुंज दिली. मात्र एमआयएमचे उमेदवार तौफिक हत्तुरे हे अवघ्या 422 मतांनी विजयी झाले.
सोलापूर महापालिकेत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, शहराध्यक्षानी राखला अवघ्या 251 मतांनी गड
सोलापुरात काँग्रेस कधीकाळी सत्तेत होती. मात्र यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व असताना ही सोलापुरात केवळ 2 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. ते ही अत्यंत कमी मताढिक्याने. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे हे प्रभाग 15 ड मधून विजयी झाले. अवघ्या 251 मतांनी चेतन नरोटे यांनी गड राखला. तर प्रभाग 16 अ मध्ये काँग्रेस उमेदवार नरसिंह आसादे यांनी 680 मतांनी विजयश्री खेचून आणला. याचं प्रभाग 16 क मध्ये एमआयएमच्या फिरदोस पटेल यांचा निसटता पराभव झाला. भाजप उमेदवार कल्पना कदम यांनी 227 मतांनी त्यांच्यावर विजय मिळवला.
राष्ट्रवादीचा 75 पारचा नारा फेल, केवळ एका पठ्याने मारलं मैदान
सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 75 पारचा नारा दिला होता. मात्र अवघ्या एका जागेवर अजित पवार गटाला विजय मिळवता आला. ते ही अत्यंत कमी मताधिक्याने. प्रभाग 25 ब मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव हत्तुरे यांनी भाजपा उमेदवार नागेश ताकमोगे याचा पराभव केला. नागेश ताकमोगे हे माजी आमदार दिलीप माने यांचे कट्टर समर्थक आणि प्रभावी नेते आहेत. मात्र त्यांना 289 मतांनी पराभवाची धूळ चारली. एमआयएमची कामगिरी देखील सोलापूर महापालिकेत लक्षवेधी राहिली. प्रभाग 16 ड मध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार हे अवघ्या 211 मतांनी पराभूत झाले. शिवसेनेचे उमेदवार प्रियदर्शन साठे यांनी त्यांचा आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा पराभव केला.
आणखी वाचा
Comments are closed.