कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असून महापालिका निवडणुकांनंतर आता सत्तास्थापनेत अनेक खलबतं पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं असलेल्या कल्याण-डोंबिवलीत (KDMC) मोठी राजकी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून (MNS) पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे स्वत: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती. अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरुन 7 वर आले होते. मात्र, निवडणुकांवेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेल्या मनसेनं आता शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय चित्र बदल्याचं दिसून येतंय.

ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही मनसेत गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे. आता हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले 5 नगरसेवका अशा 7 नगरसेवकांनी सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. स्वत: खासदार श्रीकांत यांनी याबाबत माहिती दिली.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली. ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, याबाबत माहिती नाही, ते कुठेतरी फिरायला गेले असतील. ठाकरेंच्या उर्वरित नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्यास हरकत नाही. आम्ही जो विकास करतोय ते पाहून कोणीही पाठिंबा देत असेल तर काय हरकत आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटले.

ठाकरे शिवसेना कायदेशीर कारवाई करणार

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या गट नोंदणीवेळी कोकण भवन येथे शिवसेना ठाकरे गटाचे 4 नगरसेवक अनुपस्थित होते. या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 4 नगरसेवक मशाल  चिन्हवर निवडून आले आहेत, जे सत्तास्थापनेवेळी सभागृहात अनुपस्थित राहिले.

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल

केडीएमसी – 122

शिवसेना : 53
भाजप : 50
उबाथा: 11
मनसे : 5
काँग्रेस : 2
राष्ट्रवादी : शरद पवार गट : 1

हेही वाचा

गट नोंदणीसाठी पोहोचले, पण सेना-मनसेचे नेते एकत्र भेटले, श्रीकांत शिंदे- राजू पाटील आणि नरेश म्हस्केंची चर्चा, KDMC मध्ये गेम फिरला

आणखी वाचा

Comments are closed.