मावळात दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जिल्ह्यात युती मग इथे का स्वबळावर? शरद पवार राष्ट्रवा

पुणे : पुणे जिल्ह्यात आंबेगाव पाठोपाठ मावळ तालुक्यात ही दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार सुनील शेळकेंनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळं ही आघाडी होऊ शकली नाही. असं शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी जाहीर केलं आहे. आता आम्ही महाविकास आघाडीसोबत लढतोय. आमचा सामना अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप विरोधात असेल, असं पडवळ यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचा पक्ष, काँग्रेस, वंचित, मनसे, आणि ठाकरे गट आम्ही सर्वजण युतीमध्ये लढतो आहे,  जिल्ह्यात किंवा पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर आमच्या इथे आम्हाला विश्वासात न घेता अजित पवारांच्या पक्षाने उमेदवाऱ्या जाहीर केल्या, त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कळवलं आणि आम्ही आमचे उमेदवार तुतारीवर लढवणार आहे, आणि त्यांच्या पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार आहे, आम्हाला विश्वासात न घेता, त्यांनी उमेदवार जाहीर केले म्हणून आम्ही देखील निर्णय घेतला आहे, असंही शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी घडाळ्यावर लढणार

जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथं ते चिन्ह वापरण्यात  येणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या एकाच चिन्हावर लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. अमोल कोल्हेंवर असणार आहे. जुन्नर तालुक्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचं आव्हान असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.

आंबेगावात तुतारी वि. घड्याळ लढत

शेजारच्या आंबेगाव तालुक्यात घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तुतारीकडून निवडणूक लढवणाऱ्या देवदत्त निकमांमध्ये समेट होऊ न शकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाचीही सरशी झाली तरी फायदा राष्ट्रवादीचाच होणार आहे.

महापालिका निवडणुकीवेळी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समन्व्य राखत उमेदवार दिले होते. पुणे महापालिकेचा जो भाग सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि जो भाग अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो त्या भांगामध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांवर उमेदवार उभे करून त्यांना निवडणून आणण्यात आले. एका अर्थाने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे अस्तित्व कायम राहील याची खबरदारी घेण्यात आली.

महापालिका निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली. तरीही भाजपच्या आव्हानाचा दोन्ही पक्ष सामना करू शकले नाहीत. दोन्ही ठिकाणी झालेल्या दारुण पराभवाने दोन्ही पक्षातील नेत्यांना आणखीन जवळ आणल्याचं चित्र आहे. मात्र, अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबद्दल वेगळा सूर आळवत असल्याचं बोललं जातंय.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या की महाराष्ट्रात 2029 पर्यंत कोणत्याच महत्त्वाच्या निवडणुका होणार नाहीत. अशावेळी एकीकडे अजित पवार सत्तेत राहून सत्तेचे फायदे घेण्याचा प्रयत्न करताना दिसतील, तर दुसरीकडे रोहित पवार आणि इतर नेते विरोधच राजकारणही करू शकतील. त्यामुळं दोन पक्षांचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणं पवारांच्या राजकारणासाठी फायद्याचं ठरू शकतं.

हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील घडाळ्याच्या चिन्हावर लढणार

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या बुधवारी घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामधून लढणार आहेत. त्यासाठी त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.

दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र पंचायत समितीच्या रिंगणात

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या मुलाला म्हणजेच श्रीराज भरणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार आहेत. भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे हे बुधवारी बोरी पंचायत समिती गणासाठी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. श्रीराज भरणे यांच्या एन्ट्रीमुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होणार आहे.

शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Alliance) नेत्यांनी एकत्र बैठक करुन ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधे देखील घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना दुसरीकडे दोन पक्षांमधील अंडरस्टँडिंग देखील निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र आहे. त्यामुळं न्यायलयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील एकोप्याने लढवण्याचा निर्णय घेतलाय.

महापालिका निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली. तरीही भाजपच्या आव्हानाचा दोन्ही पक्ष सामना करू शकले नाहीत. दोन्ही ठिकाणी झालेल्या दारुण पराभवाने दोन्ही पक्षातील नेत्यांना आणखीन जवळ आणल्याचं चित्र आहे. मात्र, अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबद्दल वेगळा सूर आळवत असल्याचं बोललं जातंय.

आणखी वाचा

Comments are closed.