राष्ट्रवादी एकत्र आली तरीही सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार, गोरेंना विश्वास
जयकुमार गोरे : कोणतेही पक्ष आणि कोणतीही राष्ट्रवादी एकत्र आली तरीही सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास सोलापुराचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही तुफानी फटकेबाजी केली. नगरपालिका आणि महापालिकेच्या यशानंतर आता सोलापूर जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता येणार आहे. आज पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विरोधकांवर देखील तुफानी फटकेबाजी केली.
प्रणिती ताई तुम्ही सोलापूरच्या खासदार आहेत की दिल्लीच्या, गोरेंचा टोला
खासदार प्रणिती ताई या खूप मोठ्या नेत्या आहेत. मात्र, त्यांना मला सल्ला द्यायची इच्छा होती की तुमची कार्यकर्त्यांना खूप आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल संपल्याने ते आमच्याकडे येत आहेत. त्यांना पुढे काहीच आश्वासक दिसत नसल्याने भविष्यात भाजपसोबत गेले तरच काम करणे शक्य होईल अशी त्यांची भावना असल्याचा टोला गोरे यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला. ताई तुम्ही सोलापूरच्या खासदार आहेत की दिल्लीच्या हा प्रश्न आता कार्यकर्त्यांनाही पडू लागला आहे अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला आहे. आज पंढरपूर दौऱ्यावर आले असता गोरे यांनी शिवसेना शिंदे गट अजित पवार गट या सर्वांनाच टोलेबाजी केली आहे..
स्वतःच्या ताकतीचा अंदाज नसतानाही जास्त जागा मागितल्या, शिंदेसेनेला टोला
सोलापूरमध्ये आम्ही सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत होतो, मात्र काही लोकांनी भाजपला सातत्याने रॉंग बॉक्समध्ये टाकायचा प्रयत्न केला. स्वतःच्या ताकतीचा अंदाज नसताना कधी 56 कधी 51 तर कधी 26 जागा मागत राहिलात असा टोला देखील गोरे यांनी सोलापूर शहरातील शिंदे सेनेला लगावला. आम्ही त्यांना 12 जागा द्यायला तयार होतो, जर त्यांनी ऐकले असते तर सर्व 12 जागा जिंकल्या असत्या म्हणजेच आता मिळालेल्या जागांच्या तिप्पट त्यांची संख्या वाढली असती असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र कधी कधी वास्तव समोर येणे आवश्यक असते ते सिद्धरामेश्वर आणि त्यांना दाखविले असा टोला त्यांनी लगावला.
आज बेरजेच्या राजकारणाचा खेळ
आम्ही कोणाला धक्का देत नाही तर प्रत्येकाला आता आपले घर सांभाळावे लागेल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असा टोला अजित पवार यांना लगावला. जर कोणी भाजपसोबत काम करायला येत असेल आणि आम्हाला गरज असेल तर आम्ही त्याला प्रवेश देणार असल्याचे गोरे म्हणाले. आज सर्व बेरजेच्या राजकारणाचा खेळ असल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितले. पुणे मुंबईत आमचीही लोके त्यांच्याकडे गेली होती त्यामुळे आम्ही कोणाला धक्का देत नाही असे त्यांनी सांगितले.
शहाजीबापू पाटील आणि आमची मैत्री राजकारणात येण्यापूर्वीची
शहाजीबापू पाटील आणि आमची मैत्री राजकारणात येण्यापूर्वीची आहे. राजकारणात घर आहे म्हटले की भांड्याला भांड लागत असते. सांगोला नगरपालिका निवडणुकीत बापूचे आमचे खटकले होते, पण त्यानंतर बापूंनीच फोन करून झाले गेले गंगेला मिळाले आता आपण सोबत राहायचे आहे असे सांगितल्यावर आम्ही एकत्रित सांगोल्यात जिल्हा परिषद निवडणूक लढवीत असल्याचे गोरे यांनी सांगितले. सांगोल्याचे राजकारणही विचित्र आहे बापू तिकडे होते तेव्हा शेकाप आणि दीपक साळुंखे गट आमच्या सोबत होता आता बापू आमच्याकडे आले की तो गट विरोधात गेला आहे. मात्र सांगोल्यात निकालाच्या वेळी इधर गिरा या उधर गिरा गिरेगा तो हमारे साथ ही असे सांगत कोणी निवडून आले तरी ते भाजप सोबत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
आणखी वाचा
Comments are closed.