दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार, राज्यात 40 लाख नोकऱ्यांची निर्मिती होणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या करारांमध्ये 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येते आहे. 16 टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागिदारीत आहे. या 18 देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, युएई, स्पेन, कॅनडा, बेल्जियम इत्यादींचा समावेश आहे.

औद्योगिक, सेवा, कृषी, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक येते आहे. सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर हा 75 टक्के आहे. गेल्यावर्षीचे करार हे 75 टक्के प्रत्यक्षात आलेले आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

ही गुंतवणूक 3 ते 7 वर्षांत परावर्तित होत असते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, फिनमन ग्लोबल, इस्सार, स्कोडा ऑटो, फॉक्सवेगन, एसटीटी टेलिमीडिया, टाटा, अदानी, रिलायन्स, जेबीएल, कोकाकोला, बॉश, कॅपिटल लँड, आयर्न माऊंटेन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत. काही समूह हे भारतीय असले तरी त्यांच्या सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम कम्प्युटिंग, एआय, जीसीसी, डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन स्टील, नगरविकास, जहाजनिर्माण, फिनटेक, लॉजिस्टीक, डिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे.

सर्वदूर गुंतवणूक

कोकण, एमएमआरमध्ये 22 टक्के, विदर्भात 13 टक्के, 50 टक्के राज्याच्या इतर भागात आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगावधुळे, अहिल्यानगर अशा सर्व भागात 50 हजार कोटी, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 55,000 कोटी रुपये, कोकण प्रदेशात 3,50,000 कोटी, नागपूर आणि विदर्भात 2,70,000 कोटी अशी प्रमुख आकडेवारी आहे. जायका, जेबीआयसी, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील स्टँडफोर्ड बायोडिझाईन असे अनेक संस्थात्मक करार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशातील पहिली इनोव्हेशन सिटी

टाटांसोबत देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईजवळ तयार करणार आहोत, येणार्‍या 6 ते 8 महिन्यात याचे सविस्तर नियोजन होईल. ही संकल्पना गेल्याचवर्षी दावोसमध्ये आली होती. टाटा सन्सचे एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली. यासाठी 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक टाटा करणार आहेत. इतरही अनेक देशातील गुंतवणूकदार यासाठी गुंतवणूक करणार आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणार असून मुंबईतील पाणी, हवा याचे प्रश्न यातून सोडविण्यात येतील. सर्व प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया झाली पाहिजे, हा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. पुढे हीच संकल्पना सर्व मोठ्या शहरांमध्ये नेण्यात येईल. मुंबईत पुढच्या 2 ते 3 वर्षात हा परिणाम आपण दाखवू शकू. रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा याच दावोसमध्ये करण्यात आली. या ग्रोथ सेंटरमुळे एक बिझनेस डिस्ट्रीक्ट तयार होईल. यात 1 लाख कोटींची गुंतवणूक कालच आली आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अन्य भेटीगाठी…

झिम्बॉवेचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री प्रो. अ‍ॅमोन मुरविरा यांनी महाराष्ट्राच्या सौरऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची एका परिषदेत मुक्तकंठाने प्रशंसा केली. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे उपस्थित होते.

अ‍ॅलन टुरिंग इन्सिट्युटचे मिशन संचालक अ‍ॅडम सोबे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत त्यांच्याशी वाहतूक क्षेत्राबाबत चर्चा केली. कार्बन उत्सर्जन कमी करुन स्वच्छ आणि भविष्याच्या गरजा भागवता येतील, अशा उपाययोजनांबाबत ही चर्चा झाली.

अरुप समूहाच्या अध्यक्ष हिल्डे टोन यांच्याशी नगरविकासाच्या विविध पैलूंवर, इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अ‍ॅलेसेन्ड्रो ग्युईलानी यांच्यासोबत परस्पर सहकार्य वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली.

ही बातमी वाचा:

Comments are closed.