हुंड्याची प्रथा, लेकीच्या जीवावर! राज्यात ‘क्राईम डे’, पुणे-नाशिकच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न

मुंबई : हजारो वर्षापासून स्त्री-मुक्ती आणि स्त्री-सशक्तीकरणासाठी सुरू असलेल्या लढ्याला अजून कित्येक वर्षांचा संघर्ष करावा लागणार हे माहिती नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही महिलांना जाचाला सामोरं जावं लागतंय. हुंड्याची प्रथा आता सावित्रीच्या लेकींच्या जीवावर येत आहे. या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि आताही त्या सुरूच असल्याचं दिसतंय. पुण्यात एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. नाशिकमध्ये सासरच्यांनी सुनेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर वाघोलीत नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोटच्या पोराचा जीव घेतला.

Pune Deepti Chaudhari Case : सासरच्यांचा त्रास, दीप्तीचा गळफास

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच ऊरुळी कांचनमध्ये (Uruli Kanchan ) सासरच्यांच्या त्रासापोटी पुन्हा एका वैष्णवीला जीव गमावावा लाागला आहे. सोरतापवाडीमध्ये सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं आत्महत्या केली. दीप्ती चौधरी या उच्चशिक्षित पीडितेनं तीन वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेतला.

2019 मध्ये लग्न झाल्यानंतर सातत्यानं सासरच्यांकडून चारित्र्यावर संशय, पहिली मुलगी झाल्यानं दुसऱ्यांदा जबरदस्तीनं गर्भलिंग निदान, गर्भपात,सातत्यानं पैशांची मागणी असे अनेक अत्याचार दीप्तीनं सहन केले. धक्कादायक म्हणजे दीप्तीची सासू सुनीता चौधरी ही भाजपची सरपंच आहे. तर सासरा शिक्षक आहे. त्यामुळे कुटुंबाला एवढी सर्व उच्चशिक्षित आणि सधन पार्श्वभूमी असतानाही दीप्तीचा होणारा छळ अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.

दुर्दैव म्हणजे समाजातील खोट्या इभ्रतीपायी दीप्तीच्या माहेरच्यांनीही तिच्या तक्रारीकडे अनेकदा कानाडोळा केला. माहेरच्यांनी जर वेळीच दीप्तीला धीर दिला असता तर कदाचित दीप्ती आज आपल्यात असती. त्यामुळे माहेरची दारं बंद झाल्यानं पीडिता आपोआप अन्यायाच्या अशा खाईत लोटली जाते जिथून परतीचा मार्गच कायमचा बंद होतो.

दरम्यान पती, दीर आणि सासू-सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासू आणि पतीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Nashik Crime News : नाशिकमध्ये सुनेला विष पाजण्याचा प्रयत्न

पुण्यातल्या विवाहितेच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत असतानाच नाशिकमध्ये घरच्या सुनेला सासरच्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. नाशिकमध्ये महिमा राजदेव या उच्चशिक्षित विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. कुटुंबातील वादानंतर सासरच्यांनी तिला घरी बोलावून बेदम मारहाण करत जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा आरोप महिमाच्या माहेरच्यांनी केला.

एप्रिल 2025 मध्ये महिमाचा मॉन्टी राजदेव याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून महिमाचा सातत्याने छळ करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला.

महिमाच्या सासरची विकृत मंडळी केवळ मारहाणीवर आणि विष पाजण्यावर थांबली नाहीत तर महिमाला दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करुन त्यांनी पळही काढला. गेल्या आठ महिन्यांपासून महिमाचा दीर आणि सासू सासऱ्यांकडून छळ सुरु असल्याचा आरोप महिमाच्या आईने केला. इतकंच नाही तर चोरीच्या संशयावरुन महिमाच्या बेडरुममध्येही कॅमेरे लावल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून केला जातोय.

महिमाची प्रकृती सध्या चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेनंतर आरोपी नवरा पळून गेल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. उच्चशिक्षित, प्रेमविवाह केलेल्या विवाहितेवर सासरच्यांकडून झालेल्या या छळामुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Wagholi Crime : नवऱ्याचा त्रास, पोटच्या मुलाला संपवलं

पुणे आणि नाशिकमध्ये अबला विवाहितांच्या हंबरड्यानं मन हेलावून टाकलेलं असतानाच पुण्याच्या वाघोलीत एका आईनं उचलेलं धक्कादायक पाऊल सुन्न करणारं आहे. वाघोतील दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिने 11 वर्षाच्या पोटच्या गोळ्याची हत्या केली. यानंतर तिनं 13 वर्षांच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. मात्र मुलगी घराबाहेर पळाल्यानं हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दोन्ही मुलांना मारुन सोनी जायभाय ही महिला स्वतः आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. मात्र त्याआधीच शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान, दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं हे पाऊल उचलल्याचं कळतंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोटच्या मुलांचा जीव घेण्याचा हा टोकाचा निर्णय काळजाचा थरकाप उडवणारा आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.