सुनेत्रा पवारांचं किल्ले शिवनेरीच्या साक्षीने पहिलं भाषण, बोलताना कंठ दाटून आला, म्हणाल्या, ‘मी
शिवनेरी: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती राज्यासह देशभरात उत्साहात पार पडत आहे. या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रीपासूनच शिवनेरी गडावर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शिवनेरी गडावर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ढोल ताशाच्या गजर शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवनेरीवरती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawars first speech) यांनी पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचंही दिसून आलं.(DCM Sunetra Pawars first speech)
आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा…
राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे. ज्या विचारांवर आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते.(DCM Sunetra Pawars first speech)
दादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण…
सुनेत्रा पवार यांनी बोलताना म्हटलं की, ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले शाहू आंबेडकर व विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजित दादांनी अनेकदा भाषण दिलेले आहे. दादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्लयाचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. अजित पवारांनी मागील अर्थसंकल्पात देखील आग्रा, संगमेश्वर, रायगडवढू बुद्रुक या ठिकाणी कामे सुरू केली होती. या प्रत्येक ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असेल, अशी भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली असून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला आहे. शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि इतर अनेक मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीवर आणि विशेषतः शिवजन्म स्थळाच्या आतील भागात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गडाला ऐतिहासिक वारसा जपून विद्युत रोषणाईने उजळवून टाकण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.