स्वीकृत नगरसेवक पदावरून टाळाटाळ, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये बिनसलं? नेमकं का

मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मुहूर्त साधत ठाकरे बंधूंनी एकमेकांशी हात मिळवणी केली. मात्र महानगरपालिका निवडणुकीला दोन महिने उलटायच्या आधीच ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट हे या दोन पक्षातील मतभेदाचे कारण ठरत आहे. शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर आक्षेप घेणाऱ्या ठाकरेंच्या नेत्यांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चांगलं सुनावलं आहे. निवडणुकीआधी शिंदेंवर तोफ डागणारे राज ठाकरे (Raj Thackeray) आता त्याच शिंदेंकडे शहरातील समस्यांची कैफियत घेऊन गेल्याचा दावा करत आहेत. दरम्यान ही भेट होताच मनसेला आधीपासूनच स्वीकृत नगरसेवक पद देण्यासाठी ठाकरेंच्या सेनेची सुरू असलेली टाळाटाळ आता निर्णयात बदललेली आहे. ठाकरे सेना आपल्या कोट्यातील तिघांना स्वीकृत नगरसेवक पद देणार असल्याची माहिती आहे. तर ठाकरे बंधूंच्या रूसव्या फुगव्यामुळे शिवसेनेचे मात्र चांगलंच मनोरंजन होत आहे. ठाकरे बंधूंमधील वाद नेमके कोणत्या टोकाला जातील हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Thackeray brothers)

ठाकरे बंधूंमधील विसंवादाच्या चर्चेवरून दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या काय भूमिका आहेत

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरून एक पोस्ट करत म्हटलं होतं की कोत्या मनाच्या प्रवृत्ती कडून कधीच स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये.

तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी बोलताना म्हटलं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पक्षप्रमुख आहेत एकाच घरातील दोन पक्षाचे प्रमुख आहेत. काल आदित्य यांच्यासोबत राज ठाकरे होते, त्या गोष्टीमध्ये एक मत झालं ते संदीप देशपांडे यांना माहिती आहे का आणि ते मलाही माहिती नाही, मग त्यावर भाष्य करणे हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं त्यावर मी काही बोलणार नाही, असंही पुढे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

ही युती दोन भावांची झाली होती दोन पक्ष एकत्र आले होते कार्यकर्ते जोराने जोशाने लढले होते, त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तो फक्त आमच्या पक्षाकडून राज ठाकरे येतील, तुम्ही जे म्हणतात, जे स्वीकृत असेल किंवा बाकी काही असेल ते तो निर्णय राज साहेब घेतील असं मनसेच्या पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटले, इकडे उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या भेटींच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंकडून स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन जणांची नावं स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळं मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाणार नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. 28 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे- राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (18 फेब्रुवारी)ला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या ठिकाणी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांवर विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट होती.

आणखी वाचा

Comments are closed.