स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा कोर्टात अर्ज, म्हणाला, ‘मला निर्दोष मुक्त करा’

पुणे : पुण्यासह राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला वर्ष उलटले, तरी आरोपीविरोधात न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज केला आहे. या अर्जांवर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच आरोप निश्चिती होऊन खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी पीडिता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे.(Pune Swargate Bus Depot Assault Case)

पुण्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला वर्षभराचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोप निश्चित झालेले नाहीत. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे, तर पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) निर्दोष मुक्ततेचा अर्ज सादर केला आहे. या अर्जांवर न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होऊन खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणातील पीडिता अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर गाडे घटनास्थळावरून फरार झाला होता, तो आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

या प्रकरणात तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपी गाडेविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५२ दिवसांत पोलिसांनी ८९२ पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, त्यापैकी पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. एकूण १२ पंचनामे करण्यात आले असून, त्यात गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. या पंचनाम्यांमधून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे थेट तसेच परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार काम पाहत असून, पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत.

दरम्यान आरोपी दत्ता गाडेने जामीन मिळण्यासाठी केलेले दोन्ही अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे; तसेच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्ततेसाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्याला पुणे पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध केला आहे.

स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात 893 पानांचे आरोपपत्र दाखल

स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये (Pune Swargate ST Bus Depo) झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे (Datta Gade) याच्याविरोधात 893 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर तब्बल 52 दिवसांत आरोपपत्र दाखल (Pune Swargate ST Bus Depo) करण्यात आले आहे. आरोपपत्रामध्ये 82 साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. या प्रकरणी एकूण बारा पंचनामे करण्यात आले असून, पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपी गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व घटनेतील भक्कम पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.

तपासातील कोण-कोणते मुद्दे आले समोर?

– शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर दोघांचे केस व आरोपीच्या शर्टाचे बटण सापडले असून, रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते आरोपी गाडेचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
– आरोपी दत्ता गाडे गुन्ह्याच्या दिवशी स्वारगेट बसस्थानकात पहाटेपासून असल्याचे दिसत होता, तसेच तो पीडितेशी बोलत होता,  पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बोलताना पाहिले असून, त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– आरोपी गाडे लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
– पीडितेने या अत्याचाराबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांना माहिती देऊन आरोपी गाडेचा शोध घेण्याची विनंती केली होती. या चालक-वाहकांना शोधून पोलिसांनी त्यांचे जबाव न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
– स्वारगेट एसटी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी गाडे घटनास्थळी हजर असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद आहे.
– आरोपीच्या मोबाइल नंबरवरून सायबर तज्ज्ञांमार्फत त्याची गुगल सर्च हिस्टरी तपासली. त्यामध्ये आरोपी गाडे वारंवार अश्लील व्हिडिओ पाहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुगल सर्च हिस्टरी पंचनामा करण्यात आला.
– ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला ओळखले आहे.

पोलिसांनी प्रथमच गुन्ह्याच्या तपासात तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा केला. त्यामध्ये शिवशाही बसमधून आवाज बाहेर येतो का, याची ध्वनी तंत्रज्ञांमार्फत पडताळणी करण्यात आली. मात्र आवाज बाहेर येत नसल्याचे तोडफोडीतून समजले आहे. गाडेचा फोन अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी प्रथमच गुगल सर्च हिस्टरी आणि सीसीटीव्ही पंचनामा करून आरोपी गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे शोधून काढले.

आरोपीचा डीएनए जुळला

पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये आरोपी दत्ता गाडेचा डीएनए जुळला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर त्या बसमध्ये दोघांचेही केस सापडले आहेत. त्याच्या शर्टाचे बटनही पोलिसांना बसमध्ये सापडले आहे. गुन्हा करताना घातलेला शर्टही पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात एसटी महामंडळ कर्मचारी, कॅबचालक, रिक्षाचालक त्याबरोबरच वैद्यकीय अहवाल त्याबरोबरच ओळख परेड हे महत्त्वाचे पुरावे आरोपपत्रासोबत लावण्यात आले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचीही परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.